वाळकी : पावसाच्या दांडीने बळीराजा हतबल

वाळकी : पावसाच्या दांडीने बळीराजा हतबल
Published on
Updated on

ज्ञानदेव गोरे

वाळकी(अहमदनगर) : जून महिना संपत आला तरी शेतकरी मान्सूनपूर्व पावसाच्या प्रतिक्षेतच आहे. रोहिणी व मृग नक्षत्राच्या पावसावर खरीप हंगामाची पेरणी अवलंबून असते. मात्र, ही नक्षत्र कोरडी गेल्याने शेतकरी चिंताक्रांत आणि हतबल झाला आहे. पाऊस लांबल्याने पाझर तलाव कोरडे पडले आहेत. पाण्याची पातळी खालावल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. फळबागा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असून, पाणी टंचाईचे संकट ग्रामस्थांंसमोर उभे ठाकले आहे.

नगर तालुका हा जिरायती पट्टा म्हणून ओळखला जातो. पावसाच्या भरवशावरच खरीप व रब्बी हंगामाचे नियोजन करावे लागते. शेतीसाठी जलसिंचनाची कोणतीच शाश्वत सुविधा उपलब्ध नसल्याने पावसाच्या लहरीपणाचा फटका बळीराजाला सोसावा लागतो. पावसाने सुरुवातीलाच दडी मारल्याने तालुक्याच्या दक्षिण भागातील अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जनावरांच्या चारा व पाणीटंचाईने बळीराजा हतबल झाला आहे. वाळकीतील पाझर तलाव कोरडा पडला असून, परिसरातील तलावांनीही तळ गाठला आहे. ऐन पावसाळ्यात तलाव कोरडे पडल्याने पाणी, चारा टंचाईच्या झळा शेतकर्‍यांना बसत आहेत.

वाळकी परिसर फळबागांचे आगार म्हणून पुढे आला आहे. परंतु, पाऊस लांबल्याने फळबागांचे आस्तित्व धोक्यात आले आहे. वाळकी, तांदळी, वडगाव, खडकी, सारोळा कासार, बाबुर्डी बेंद, हिवरे झरे, अकोळनेर, देऊळगाव सिद्धी, राळेगण म्हसोबा, गुंडेगाव, बाबुर्डी घुमट, हिवरे झरे, घोसपुरी, वाळुंज, पारगाव मौला, दहिगाव, रुईछत्तीसी, साकत, उक्कडगाव, गुणवडी, वाटेफळ, मांडवा, सांडवा आदी गावांमध्ये शेतकर्‍यांच्या मोठ्या प्रमाणात संत्रा फळबाग आहेत.

जून महिना उलटण्याच्या मार्गावर असतानाही पावसाने दांडी मारल्याने या परिसरातील संत्रासह डाळिंब, लिंबू, मोसंबी या फळबागा धोक्यात आल्या आहेत. पावसाने ओढ दिल्याने फळबागा ताण बसून जळू लागल्या आहेत. विकतच्या पाण्यावर फळबागा वाचविण्याची धडपड बळीराजाला करावी लागत आहे.

इंधन खर्च वाढल्याने भुर्दंड सोसून शेतीची मशागत करून खरिपाची तयारी करत असलेला शेतकरी आता पाऊस लांबल्याने चिंतातूर झाला आहे. पावसाने ओढ दिल्याने वाळकीसह गुंडेगाव परीसरात पेरण्या खोळंबल्या आहेत. महागडी बियाणे आणि खते खरेदी करूनही पावसाची प्रतिक्षाच असल्याने गुंडेगाव येथील हजारो हेक्टर खरिपाचे नियोजन धोक्यात सापडले आहे. मुगाच्या पेरणीची वेळ निघून गेली आहे. यामुळे खरीप हंगामातील पिके मागास होण्याची शक्यता वाढली आहे. पूर्वमोसमी पावसाने पेरणीयोग्य परिस्थिती तयार होते.

यंदा मात्र मान्सूनपूर्व पाऊस न झाल्याने खरिपाच्या पेरण्या लांबल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. महागडी बियाणे व खते खरेदी करूनही पावसाने ओढ दिल्याने खर्च मातीमोल होणार असल्याने बळीराजा हतबल झाला आहे. परिसरात बाजरी, मका, तूर, मूग, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन, कपासी आदी खरीप पिकांच्या पेरणीचे नियोजन शेतकर्‍यांनी केले असले तरी पाऊस लांबल्याने नियोजन कोलमडले आहे.

तलावातून बेसुमार पाणी उपसा

वाळकी, देऊळगाव सिद्धी, वडगाव तांदळी तलावातून शेतीसाठी अनधिकृतपणे बेसुमार पाणी उपसा होत असल्याने तलावातील पाणी पातळी झपाट्याने खालावत आहे. वाळकी तलाव गेल्या तीन वर्षांपासून पूर्ण क्षमतेने भरत असला तरी बेसुमार पाणी उपश्याने ऐन उन्हाळ्यात कोरडा पडत आहे. त्यामुळे पाणी टंचाईची गंभीर समस्या नागरिकांना भेडसावत आहे.

कृषी विभागाने खरिपाचे नियोजन करूनही पाऊस नसल्याने पेरण्या लांबल्या आहेत. जूनअखेर पाऊस न झाल्यास खरिपाचे नियोजन कोलमउेल. खरीप पेरणीचे उद्दिष्ट कमी होऊ शकते.

– नारायण करांडे,
कृषी मंडलाधिकारी, वाळकी

इंधनाचा जादा खर्च करून शेतीची मशागत केली. खते -बियाणे खरेदी केली. मात्र, पावसाअभावी पेरण्या लांबल्या आहेत. पाऊस न झाल्यास हंगाम वाया जाणार आहे. त्यामुळे शेतकरी अजून अडचणीत येईल.

– संतोष कोतकर,
शेतकरी, गुंडेगाव

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news