सोलापूर : पाऊस न पडल्याने ‘स्काडा’ची चाचणी लांबणीवर | पुढारी

सोलापूर : पाऊस न पडल्याने ‘स्काडा’ची चाचणी लांबणीवर

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  शहराचा पाणीपुरवठा सुधारण्यासाठी स्काडा ही अत्याधुनिक प्रणाली राबविण्यात येणार आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर या संदर्भातील चाचणी नियोजन होत; मात्र अद्याप पावसाचे आगमनच न झाल्याने ही चाचणी लांबणीवर पडली आहे.

पाणी हा शहरचा कळीचा मुद्दा समजला जातो. या ना त्या कारणामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होणे, ही नित्याचीच बाब आहे. हे चित्र दूर करण्यासाठी 72 कोटी रुपये खर्चून स्काडा ही अत्याधुनिक प्रणाली राबविण्यात येणार आहे. अशी प्रणाली राबविणारे सोलापूर हे राज्यातील चौथे शहर आहे. या प्रणालीचे काम पूर्ण झाले असून चाचणीअभावी प्रणाली कार्यान्वित करण्याचे काम अडले आहे. महापालिका प्रशासनाचे 15 जूननंतर जुळे सोलापुरातील दोन एमबीआरची तसेच व्हॉल्व्ह ऑटोमॅटिक पद्धतीने सोडण्याची चाचणी करण्याचे नियोजन होते. पावसाळा सुरू झाल्यानंतर पाण्याची मागणी कमी होत असल्याने ते गृहीत धरून 15 जूनपर्यंत प्रशासन पावसाची वाट पाहत होते, पण पावसाचे आगमनच लांबल्याने ‘स्काडा’ची चाचणी लांबणीवर पडली आहे. आगामी काही दिवसांत एखादा मोठा पाऊस झाल्यावर चाचणी करण्यात येणार आहे.

ही चाचणी यशस्वी झाल्यास शहराचा पाणीपुरवठा बहुतांशी स्वयंचलित पद्धतीने होणार आहे. परिणामी, पाणीपुरवठ्यात प्रचंड सुधारणा दिसून येण्याबरोबरच नागरिकांच्या तक्रारीही कमी होणार आहेत. एकंदर सध्या चार दिवसांआड आणि तेही अवेळी होणार्‍या पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त आहेत. स्काडा प्रणाली कार्यान्वित झाल्यावर निश्चितपणे पाणीपुरवठ्यात आमूलाग्र बदल होऊन सुकरपणे पाणीपुरवठा होणार आहे.

प्रणाली अंतर्गत झाली ही कामे

या प्रणाली अंतर्गत उजनी, पाकणी, हिप्परगा, शेळगी, कोंडी, सोरेगाव, दहिटणे, जुळे सोलापुरातील एमबीआर, शहरातील 62 जलकुंभ याबरोबरच इनलेट, आऊटलेट, बायबास या ठिकाणी स्वयंचलित वॉल्व्ह, वॉटर मीटर बसविण्यात आले आहेत. स्मार्ट सिटी एबीडी एरियातील 22 झोनमध्येही वॉल्व्ह व वॉटर मीटर बसविण्यात आले आहेत. याशिवाय पॅन सिटीमध्येदेखील (शहरातील एबीडी एरिया वगळता उर्वरित भाग) वॉटर मीटर बसविण्यात आले आहेत. एकूण 603 वॉटर मीटर, 332 अ‍ॅटोमॅटिक स्लुईस वॉल्व्ह, 105 स्लुईस वॉल्व्ह, एबीडी एरियातील 1600 घरगुती नळांना सॅम्पल वॉटरमीटर बसविण्यात आले आहेत. जलकुंभांजवळ अ‍ॅटोमेटिक लेव्हल इंडिकेटर तसेच सोरेगाव, टाकळी लाईनवर वॉटर मीटर बसविणे, मेडिकल पंप हाऊस येेथे वॉल्व्ह तसेच पॅनसिटीमध्ये वॉटरमीटर बसविण्यात आले आहेत.

पावसाळ्यात पाण्याची मागणी कमी झाल्यानंतर स्काडा प्रणालीची चाचणी करणे नियोजन आहे; मात्र अद्याप पावसाचे आगमनच न झाल्याने चाचणी लांबणीवर पडली आहे. एखादा मोठा पाऊस झाल्यास लगेचच चाचणी करून यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल.
– व्यंकटेश चौबे पाणीपुरवठा अधिकारी, मनपा

Back to top button