अहमदनगर : कचरा कागदावर, अ‍ॅनिमल वेस्ट रस्त्यावर | पुढारी

अहमदनगर : कचरा कागदावर, अ‍ॅनिमल वेस्ट रस्त्यावर

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेचा कचरा संकलनाचा ठेका गुजरातमधील एका संस्थेला दिला आहे. नवी संस्था असली तरी कचरा संकलनाचा बोजवारा उडाला आहे. तर, दुसरीकडे घनकचरा विभागाकडे कचरा संकलनाचे आकडे कागदावरच दिसत आहेत. प्रत्यक्षात उपनगरामध्ये चार दिवस कचरागाडी फिरकत नाही. रस्त्यावर पडलेल्या अ‍ॅनिमलवेस्टवर कुत्रे ताव मारताना दिसत आहेत.
महापालिकेत गेल्या काही वर्षांपासून कचरा संकलन बाह्य संस्थेमार्फत केले जाते.

त्यासाठी महापालिकेची काही वाहने व संबंधित संस्थेची काही वाहने असतात. कचरा संकलनापोटी महापालिका संबंधित ठेकेदाराला कोट्यवधीचे बिल अदा करीत आहे. गत वर्षी कचरा संकलनाचा ठेका पुण्यातील स्वयंभू संस्थेला देण्यात आला होता. मात्र, त्या संस्थेवर गैरव्यवहाराचे आरोप झाल्याने ठेका रद्द करण्यात आला. कचरा संलनाचा ठेका गुजरातमधील श्रीजी कंपनीला देण्यात आला आहे. श्रीजी कंपनीला ठेका देऊन काही महिने झाले तरी अद्यापि शहरातील कचरा संकलन सुरळीत झालेले आहे.

सावेडी उपनगरासह शहरात दररोज घंटागाडी येत नाही, असा आरोप सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केला होता. तर, स्थायी समितीमध्ये विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेविका रुपाली वारे यांनी आवाज उठविला होता. त्यावर घनकचरा विभागाकडून तत्काळ घंटागाड्या वाढून दररोज कचरा संकलन करण्यात येईल, असे सांण्यात आले होते. मात्र, आजही प्रत्यक्षात काही भागात दररोज कचरा गाडी जात नाही. चार ते सहा दिवस कचरा गाडी जात नसल्याने नागरिक रस्त्यावर कचरा आणून टाकीत आहेत. त्यात रस्त्यावर गोणीत भरून टाकलेल्या अ‍ॅनिमल वेस्टवर कुत्रे ताव मारताना दिसत आहेत.

कचर्‍यासंदर्भात वारंवार तक्रारी करून थकलो आहे. महापालिकेने शासनाची दिशाभूल करून खोटे बक्षिसे मिळविली आहेत. आता आम्ही थेट शासनकडे तक्रार करणार आहोत.

– रूपाली वारे, नगरसेविका

हेही वाचा

अहमदनगर जिल्ह्यासाठी 241 कोटींची नुकसानभरपाई मंजूर

नाशिक : चालकाला फिट आल्याने बस थेट फूटपाथवर! पंचवीस विद्यार्थी बालंबाल बचावले

अहमदनगर : पोलिसांना लागेनात हल्लेखोरांचे धागेदोरे

Back to top button