

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : सततच्या पावसाने बाधित झालेल्या शेतकर्यांना राज्य शासनाने आर्थिक दिलासा दिला. जिल्ह्यातील 2 लाख 92 हजार 751 शेतकर्यांना नुकसानभरपाई अदा करण्यासाठी शासनाने 241 कोटी 1 लाख 43 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील 2 लाख 85 हजार 765 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले. याचा आर्थिक फटका जिल्ह्यातील 4 लाख 68 हजार 862 शेतकर्यांना बसला आहे. या बाधित शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने 586 कोटी 30 लाख रुपयांचा निधी उपलब्ध व्हावा, असा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वीच राज्य शासनाकडे पाठविला होता.
सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच 1500 कोटी रुपयांचे निधी मंजूर केला आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील 241 कोटी रुपयांचा समावेश आहे. जिल्ह्यासाठी 586 कोटींचा निधी आवश्यक होता. मात्र, शासनाने फक्त 1 लाख 90 हजार 470 हेक्टर क्षेत्रासाठी 241 कोटी 1 लाख 43 हजार रुपयांचा निधी मंजूर केला. या निधीचा लाभ 2 लाख 92 हजार 751 बाधित शेतकर्यांना होणार आहे.
हेही वाचा