श्रीरामपूर : ज्ञान, मेहनत कधीही वाया जाणार नाही : कृष्णप्रकाश | पुढारी

श्रीरामपूर : ज्ञान, मेहनत कधीही वाया जाणार नाही : कृष्णप्रकाश

श्रीरामपूर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : भारतातील युवाशक्ती ही जगातील सर्वात मोठी शक्ती आहे.या शक्तीला योग्य मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली तर तो प्रचंड ऊर्जेचा मोठा स्रोत आहे. ज्ञान आणि मेहनत याचे महत्त्व युवाशक्तीने ओळखून जीवनाची वाटचाल केल्यास हवे ते यश खेचून आणता येईल, यासाठी आपल्यात असलेल्या शक्तीला ओळखा आणि जिद्द आणि प्रयत्न सोडू नका, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक श्रीकृष्ण प्रकाश यांनी बोलताना केले.

श्रीरामपूर येथील साई सोशल फाउंडेशन व हेमंत ओगले मित्र मंडळ तसेच करण ससाणे मित्र मंडळाच्या वतीने ‘वेध भविष्याचा’ या विषयावर युवकांना मार्गदर्शन करणारा कार्यक्रम येथील गोविंदराव आदिक सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त पोलीस महासंचालक श्री कृष्ण प्रकाश विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करीत होते. त्यांनी सुमारे एक तास भर केलेल्या घणाघाती भाषणात जीवनातील अनुभव सांगून युवकांना मोठ्या प्रेरणास्त्रोताची ओळख करून दिली.

कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या ज्येष्ठ पदाधिकारी श्रीमती मीनाताई जगधने या होत्या.करिअर मार्गदर्शनाच्या या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध व्याख्याते संतोष कारले, तूशाबा शिंदे, भाग्यश्री बानायत तसेच अशोक समूहाचे प्रमुख भानुदास मुरकुटे यांना पाचारण केले होते. कृष्ण प्रकाश म्हणाले, युवाशक्तीला योग्य मार्गदर्शन मिळाले तर तिचा उपयोग देशासाठी होतो अन्यथा ती शक्ति गुन्हेगारी, दंगेखोर, आतंकवादी आदी टोकाच्या भूमिकेकडे वळते.

मोठे विचार ठेवा, मोठी स्वप्ने पहा, म्हणजे त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न होतील. कुणाच्या टीकेकडे लक्ष देऊ नका आपले लक्ष कामावरच ठेवा, आपल्या कामाने त्याला प्रत्युत्तर द्या. लोक आपली किंमत करतात म्हणून स्वतःला कधीही विकू नका, आपले लक्ष्य निशित ठेवा. आपल्यातील शुद्धता, घडवण्यासाठी लागणारी मेहनत, कार्य कौशल्य आणि सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची प्रवृत्ती या चार बाबी सतत जागृत ठेवा. थकू नका, थांबू नका, सतत चालत राहा, असा संदेश त्यांनी दिला.

संतोष कारले यांनी विद्यार्थ्यांना डिग्रीच्या नंतरचे विविध कोर्सेस व ज्ञानाचे दरवाजे असल्याचे सांगितले त्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. रेल्वेमधील उच्च अधिकारी तु शाबा शिंदे यांनी रेल्वे मधील विविध संधीची माहिती दिली. नाशिक येथील महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती भाग्यश्री बानायत यांनी विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तर रूपाने स्पर्धा परीक्षांची माहिती दिली. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी कष्टाशिवाय पर्याय नाही हे सांगताना आपल्या विद्यार्थी दशेतील कठीण प्रसंगातून केलेल्या वाटचालीची माहिती दिली. मिनाताई जगधने यानी केवळ मार्कांच्या मागे लागूनका असा सल्ला विद्यार्थी व पालकांना दिला. चांगले नागरिक बना असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रमुख वक्ते श्रीकृष्ण प्रकाश, तुशाबा शिंदे, श्रीमती भाग्यश्री बानायत, संतोष कार्ले, भानुदास मुरकुटे यांचे सत्कार झाला.

हेही वाचा

Ashadhi Wari 2023 : सोमेश्वरला रंगले सोपानकाकांचे पहिले अश्वरिंगण

सोलापूर : सुरत-चेन्नई महामार्गाच्या मोबदल्यासाठी रयत क्रांती संघटना आक्रमक; रास्‍ता राेकाे आंदाेलन

वाळकी : दशमीगव्हाण येथे पाठलाग करून पकडले चोर

Back to top button