अहमदनगर : टवाळखोरांना सोडणार नाही : चंद्रशेखर यादव | पुढारी

अहमदनगर : टवाळखोरांना सोडणार नाही : चंद्रशेखर यादव

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : शाळा भरताना आणि सुटताना छेडछाड, पाठलाग करून त्रास देणार्‍यांची माहिती मुलींनी न घाबरता कळवली पाहिजे. मुलींनी तसेच शिक्षकांनी पोलिस ठाण्यात या रोडरोमिओंची तक्रार केल्यास तातडीने कारवाई केली जाईल, असे आश्वासन कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिले.

शहरातील रूपीबाई बोरा हायस्कूल येथे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विद्यार्थिनींसाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरात पोलिस निरीक्षक यादव बोलत होते. मुलींची छेडछाड, शेरेबाजी आणि पाठलाग करण्याचे प्रकार होऊ नये, यासाठी कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत. रोडरोमिओंना कुणीही जाब विचारत नसल्याने काहीवेळा त्यांची हिंमत वाढताना दिसते.

कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी शहरातील शाळांमध्ये जाऊन मार्गदर्शन शिबिर घेण्यास सुरुवात केली आहे. कुणीही छेड काढल्यास तात्काळ पोलिसांकडे तक्रार द्यावी, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच, मुलींना तक्रार करण्यासाठी शाळेत तक्रार पेटी लावली जावी, मुलींना त्रास होत असल्यास त्यांना तक्रार करण्यास सांगावे, शाळेच्या आवारात सीसीटीव्ही बसवावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी शाळा प्रशासनाला केले. रुपीबाई बोरा स्कूलचे मुख्याध्यापक अजय बारगळ, अशोक फिरोदिया, पोलिस हवालदार योगेश खामकर, देवेंद्र पंधरकर यांची उपस्थिती होती.

टवाळखोरांची माहिती द्या

शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात विनाकारण मोटरसायकवरून फिरणार्‍यांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक यादव यांनी केले. मुलींना विनाकारण त्रास देणार्‍यांवर तत्काळ कारवाई केली जाईल. काहीही तक्रार असेल, अडचण असेल तर पोलिस ठाण्याच्या 0241 2416117 किंवा 112 या मदत क्रमांकावर संपर्क करून माहिती द्यावी. तसेच पोलिस निरीक्षक यादव यांच्या 7777924603 या मोबाईल क्रमांकावर मेसेज करून सुद्धा तक्रार करता येईल.

हेही वाचा

पुणे पालिका शिक्षकांच्या बदल्यांना यंदा मुहूर्त 

अहमदनगर : इमामपूरजवळ अपघातात कंटेनरचालकाचा मृत्यू

गांजा विक्रीसाठी पुण्यात आलेल्या तरुणांना बेड्या

Back to top button