पुणे पालिका शिक्षकांच्या बदल्यांना यंदा मुहूर्त  | पुढारी

पुणे पालिका शिक्षकांच्या बदल्यांना यंदा मुहूर्त 

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिका कर्मचार्‍यांच्या बदल्यानंतर आता यंदा शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. चार ते पाच वर्षांपासून या बदल्यांना मुहूर्त मिळाला नव्हता. यावर्षी मात्र शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्याही बदल्या केल्या जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. महापालिकेच्या शिक्षण विभागातील शिक्षकांच्या बदल्यांसाठी धोरण आखण्यात आले आहे. त्यानुसार दरवर्षी 20 टक्के शिक्षकांच्या तसेच विनंती अर्जाच्या बदल्या होणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या जवळपास चार वर्षांपासून बदल्या होऊ शकलेल्या नाहीत. गतवर्षी शिक्षण विभागाने जून महिन्यात बदल्यांचा प्रस्ताव ठेवला होता.
मात्र, प्रस्तावास विलंब झाला असल्याने अतिरिक्त आयुक्तांनी पहिल्या सहा महिन्यानंतर बदल्यांचा प्रस्ताव ठेवण्यास सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र हा प्रस्ताव ठेवण्यास पुन्हा विलंब झाल्याने गतवर्षी बदल्या होऊ शकल्या नव्हत्या. यावर्षी मात्र महापालिका कर्मचार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रिया झाली. त्यानुसार आता शिक्षकांच्या आणि इतर कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र, मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे त्यास मुहूर्त मिळाला नव्हता. आता प्रशासनाकडून 150 मुख्याध्यापक आणि जवळपास दोनशेहून अधिक शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया झाली. त्यामुळे आता बदल्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार आता नियमित, विनंती अर्ज आणि विषयानुरूप बदल्या यांची प्रक्रिया पूर्ण होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
महापालिका शिक्षक आणि कर्मचार्‍यांच्या बदलीची प्रक्रिया या वर्षी राबविली जाणार आहे. त्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला केल्या आहेत.
                                                                       -रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका  
हे ही वाचा : 

Back to top button