पुणे : विमानतळ-विमाननगर मिसिंग लिंक 15 दिवसांत जोडणार | पुढारी

पुणे : विमानतळ-विमाननगर मिसिंग लिंक 15 दिवसांत जोडणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : विमानतळ ते विमाननगरला जोडणार्‍या रस्त्यावरील मिसिंग लिंक जोडण्यासाठी संरक्षण विभागाची 22 गुंठे जागा महापालिकेच्या ताब्यात दिल्यानंतर शुक्रवारी (दि.16) स्थायी समितीने याबाबतच्या प्रस्तावास मंजुरी दिली. त्यामुळे पंधरा ते वीस दिवसांमध्ये रस्ता जोडण्याचे काम पूर्ण होऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. विमाननगर ते विमानतळ या मार्गावरून प्रवास करणार्या प्रवाशांना सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

विमानतळाच्या एक्झिट गेटमधून बाहेर पडून विमानतळाकडे जाणारा रस्ता संरक्षण विभागाच्या जागेमुळे ब्लॉक झाला होता. त्यामुळे मिसींग लिंक दूर करण्यासाठी संरक्षम विभागाची 22 गुंठे जागा मिळण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात होते. त्याला यश मिळाले असून, जागा महापालिकेच्या ताब्यात देण्यास संरक्षण विभागाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा सामंजस्य करार झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव तयार करून स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडला होता. रस्त्याची ही मिसींग लिंक केवळ 100 मीटर लांबीची असून, पंधरा दिवसांत लिंक जोडण्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या आहेत.

शहरातील 395 रस्ते तयार आहेत. मात्र, काही मीटर जागा ताब्यात न आल्याने त्यांचा वापर होत नाही. अशा या मिसिंग लिंकच्या रस्त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यावर 7 जुलैला बैठक होणार आहे. त्यानंतर पहिल्या टप्प्यात जे रस्ते 30 ते 40 मीटर जागेसाठी रखडले आहेत, अशा रस्त्याचा प्रश्न सोडवून हे रस्ते पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.

 

Back to top button