

राहुरी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नगर- मनमाड राज्य महामार्गावर रात्रीच्या दरम्यान चारचाकी वाहनातून आलेल्या चार चोरट्यांनी चारचाकी वाहनास आपले वाहन आडवे लावून 9.50 लाख रूपयांची रोकड व 3 तोळे सोन्याचे दागिणे लुटल्याने संताप व्यक्त होत आहे. 'तुला जीवे मारण्याची सुपारी मिळाली असून, तू आम्हाला भावाकडून, मित्राकडून पैसे आणून दे, अन्यथा तुझा जीव घेऊ,' असे धमकावत लुटारूंनी पळ काढला.
राहुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारदारीत अनिल रामचंद्र घाडगे म्हणाले, ( दि. 12 जून) रोजी स्वतःच्या चारचाकी वाहनातून अ. नगर येथे गेले होते. नगर येथून राहुरीकडे येताना रात्री 9.30 वाजेच्या दरम्यान मुळा डॅम फाट्याजवळ नगर -मनमाड राज्य महामार्गावर पवार पेट्रोल पंपासमोर मागून आलेल्या चारचाकी वाहनाने घाडगे यांची गाडी अडवली. गाडीमधून चार अनोळखी तरूण तोंडाला रुमाल बांधून उतरले. त्यांनी अनिल घाडगे यांचा वाहन चालक सुरेश शेटे (रा. गडधे आखाडा, ता. राहुरी) यास शस्त्राचा धाक दाखवून खाली उतरवून मागे बसवले. नंतर चार चोरटे घाडगे यांच्या गाडीत बसले.
त्यांनी घाडगे व वाहन चालकाच्या डोळ्यावर पट्टी बांधून गाडी वांबोरीच्या दिशेने नेली. चोरट्यांनी अनिल घाडगे यांच्या जवळील साडेनऊ लाखाची रोकड दोन तोळ्याची साखळी व एक तोळ्याची सोन्याची अंगठी असा एकूण 10 लाख 20 हजार रूपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने लुटला. म्हणाले, 'आम्ही तुला मारण्याची सुपारी घेतली आहे. तू आम्हाला तुझ्या भावासह मित्राकडुन आणखी पैसे आणुन दे, नाहीतर आम्ही तुला ठार मारु,' अशी धमकी दिली. त्यानंतर चोरट्यांनी घाडगे व त्यांच्या चालकाला कमरेच्या पटट्याने मारहाण करून वांबोरी घाटात सोडून पसार झाले. या थरारानंतर अनिल घाडगे यांनी राहुरी पोलिसात फिर्याद दिली. चौघांवर गुन्हा दाखल झाला.
हेही वाचा