

वाळकी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील दक्षिण भागातील 17 गावांना पाणीपुरवठा करणार्या घोसपुरी पाणी योजनेची पाईपलाईन रेल्वेचे काम करणार्या कर्मचार्यांकडून फुटल्याने या पाणी योजनेतून होणारा पाणीपुरवठा बंद पडला आहे . त्यामुळे भाजपाचे पदाधिकारी चांगलेच संतप्त झाले, त्यांनी पाईपलाईन फुटली तेथे भेट देत रेल्वेचे काम करणारे अभियंता व कर्मचार्यांना चांगलेच धारेवर धरले.
घोसपुरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन विसापूर उक्कलगाव रेल्वे लाईनच्या जवळ रेल्वेचे काम करणार्या कर्मचार्यांकडून फुटल्याची माहिती मिळताच भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस दिलीप भालसिंग यांनी त्या ठिकाणी धाव घेत पाहणी केली. यावेळी तेथे रेल्वेच्या दुहेरी करणाचे काम करणार्या ठेकेदार संस्थेच्या संबंधित अभियंत्यांना बोलावून घेत जाब विचारला.
तसेच फुटलेली पाईपलाईन तात्काळ दुरुस्त करून पाईपलाईन चालू करण्याचे संबंधित ठेकेदारशी बोलून काम पूर्ण करण्याचे कर्मचार्यांना सांगण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र कडूस, प्रा.शहाजान तांबोळी, सुनील गट, सतीश गट, दत्तात्रय धामणे, घोसपुरी योजनेचे कर्मचारी सिद्धार्थ सासवडे, किसन दरोडे आदीसह नागरिक उपस्थित होते.
हेही वाचा