कोल्हापूर : यंदा उसाच्या क्षेत्रात 13 हजार हेक्टरने वाढ | पुढारी

कोल्हापूर : यंदा उसाच्या क्षेत्रात 13 हजार हेक्टरने वाढ

कोल्हापूर;  पुढारी वृत्तसेवा :  उसाला मिळणार्‍या चांगल्या दरामुळे सध्या ऊस पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात सुमारे 30 हजार हेक्टरने उसाचे क्षेत्र वाढले आहे. यावर्षी 13 हजार हेक्टरची वाढ झाली आहे. यामुळे उत्पादनातही वाढ होणार असून कारखान्यांनी त्यासाठी नियोजन करून पुढील हंगामाची तयारी सुरू केली आहे.

जिल्ह्यातील सर्व नद्यांवर धरणे झाल्यामुळे नद्यांमधून बारमाही पाणी वाहत आहे. यामुळे जिल्ह्यात सिंचनाच्या सुविधांमध्ये वाढ झाली आहे. यामुळेही शेतकर्‍यांचा कल ऊस लागणीकडे वाढत आहे. उसाचे क्षेत्र वाढत जाईल, तसे कारखान्यांनी गाळप क्षमतेत वाढ करणे सुरू केले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात दररोज अडीच हजार मेट्रिक टन गाळप क्षमता असलेल्या कारखान्यांनी त्याची मर्यादा पाच ते साडेसात हजार मेट्रिक टन गेली आहे. त्यामुळे असाची तोडणी लवकर होऊ लागली आहे. याशिवाय साखर उतारा चांगला असल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांनी उसाला एकरकमी 3 हजार रुपयांवर दर दिला जात आहे. यामुळेही शेतकर्‍यांना ऊस लागणीसाठी प्रोत्साहन मिळत आहे.

यावर्षीची सुरू हंगामाची उसाची लागवड झाली आहे, अडसाली उसाच्या लागणी सुरू असून त्या अंतिम टप्प्यात आला आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 1 लाख 88 हजार हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. महिना अखेरपर्यंत त्यात वाढ होऊन एकूण 1 लाख 90 हजार हेक्टरपर्यंत उसाची लागण होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.

उसाच्या क्षेत्रात झालेली वाढ अशी

जिल्ह्यामध्ये 2021 ते 22 या हंगामात 1 लाख 60 हजार हेक्टवर उसाची लागण होती, तर 2022 ते 23 मध्ये 1 लाख 76 हजार झाली, यावर्षी 1 लाख 90 हजार हेक्टरपर्यंत जाईल, असे चित्र आहे.

Back to top button