नगर : कापूस बियाणे विक्रीतून कमाई ; सहा कृषी दुकानांचे परवाने निलंबित | पुढारी

नगर : कापूस बियाणे विक्रीतून कमाई ; सहा कृषी दुकानांचे परवाने निलंबित

 नगर : पुढारी वृत्तसेवा : कापूस बियाणे विक्री चढ्या दराने विक्री केल्याचे आढळून आल्यामुळे कृषी विभागाच्या भरारी पथकाने 4 बियाणे विक्री केंद्रांचे तसेच 2 कीटकनाशके विक्री केंद्रांचे परवाने निलंबित केले आहेत. निविष्ठा विक्री केंद्र चालकांनी कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन करु नये अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा कृषी विभागाने दिला आहे. सध्या खरीप हंगाम सुरु झालेला असून, बाजारामध्ये शेतकर्‍यांची बी-बियाणे, खते व इतर कृषि निविष्ठा खरेदीसाठी लगबग सुरु झालेली आहे.

यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरामध्ये पुरवठा होणेचे दृष्टीने कृषि विभागाने सूक्ष्म नियोजन केलेले आहे. यासाठी जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक तालुकास्तरावर तक्रार निवारण समिती कार्यरत करण्यात आली असल्याचे प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले आहे. शेतकर्‍यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठांची उपलब्धता व्हावी, कमी दर्जाच्या निविष्ठांमुळे फसवणूक होऊ नये, यासाठी जिल्हास्तरावर 1 व प्रत्येक तालुकास्तरावर 1 असे एकूण 15 भरारी पथके जिल्हाभरात कार्यकरत आहेत.

या भरारी पथकांमार्फत निविष्ठा विक्रेत्यांची अचानक तपासणी केली जात आहे. शेतक-यांची कोणत्याही प्रकारची फसवणूक करणार्‍या विक्री केंद्रांवर तातडीने कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. कृषी निरीक्षकांनी केलेल्या तपासणीत दोषी आढळून आलेल्या 4 बियाणे विक्री केंद्रांचे व 2 कीटकनाशके विक्री केंद्रांचे परवाने निलंबीत करणेत आलेली आहेत. निविष्ठा उत्पादकांनी किंवा
जिल्हयामधील निविष्ठा विक्री केंद्र चालकांनी कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन करु नये अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बोराळे यांनी दिला आहे.

हे ही वाचा : 

दहावीची गुणपत्रिका आजपासून मिळणार

नगर : नादुरुस्त एसटी प्रवाशांसाठी डोकेदुखी

Back to top button