

कोल्हार (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : प्रवाशांना अनेक सुविधा दिल्याने प्रवाशांचा कल एसटी बसकडे वाढला आहे. एसटी बसने प्रवास करणार्यांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत आहे. असे असले तरी अलीकडच्या काळात नादुरुस्त एसटी बस रस्त्यावरून धावत असल्याने या बस रस्त्यावर मध्येच बंद पडत असल्याने एसटी बस चालक वाहक व प्रवाशांना मोठे डोकेदुखी ठरत आहे.
गेल्या एक महिन्यात कोल्हार व परिसरात एसटी बस रस्त्यात बंद पडून प्रवाशांचे हाल झाल्याच्या अनेक घटना घडल्याने सुरक्षित एसटी प्रवास आता प्रवाशांसाठी असुरक्षित व तापदायक ठरत आहे.
सवलत नको पण प्रवाशांचे हाल थांबवा, असे म्हणण्याची वेळ एसटी बसने प्रवास करणार्या प्रवाशांवर आली आहे. याचा प्रत्यय सोमवारी सकाळी नऊ वाजता कोल्हार- लोणी रस्त्यावर आला तारकपूर डेपोची नगर- नाशिक बस (क्रमांक एमएच 7 सी 9134) ही बस कोल्हार- लोणी रस्त्यावर एका अरुंद पुलाजवळ एसटी बसचे प्रेशर डाऊन व लायनर जाम झाल्याने रस्त्यातच बंद पडली. या बस ने 55 प्रवासी प्रवास करीत होते. या प्रवाशांमध्ये परीक्षेला जाणारे विद्यार्थी तसेच कार्यालयीन कर्मचारी व ज्येष्ठ नागरिक व महिलांची संख्या मोठी होती. ही बस मध्येच बंद पडल्याने परीक्षेसाठी जाणारे विद्यार्थी व कार्यालयीन कर्मचारी तसेच महत्त्वाच्या कामासाठी निघालेले काही नागरिक यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले.
अखेर वाहकाने याच रूट वरून जाणार्या एसटी बसेसच्या चालक वाहकांना विनंती करून बस थांबवून प्रवाशांना या बसेस मध्ये बसवून दिले. तरी देखील या प्रवाशांना एक तासभर उन्हामध्ये ताटकळत उभे राहावे लागल्याने या प्रवाशांची खूपच हाल झाली. यावेळी या रस्त्याने जाणारे पत्रकार प्रमोद कुंभकर्ण यांनी देखील चालक वाहकांना व प्रवाशांना मदतीचा हात दिला. ही बस लोणी रस्त्यावरच्या अरुंद पुलाजवळ बंद पडल्याने वाहतुकीची कोंडी ही झाली. ज्या ठिकाणी ही बस बंद पडली ते अपघाती स्थळ असल्याने चालक वाहक यांनी सावध भूमिका घेऊन आपली जबाबदारी पार पडली.
हे ही वाचा :