

नगर : पुढारी वृत्तसेवा : कर्जत बाजार समिती पदाधिकारी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे एक मत फुटले, त्याला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके हेच जबाबदार असल्याचा आरोप करत पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी मंगळवारी फाळके यांच्या कर्जत येथील घरासमोर निदर्शने केली. तसेच फाळके यांच्या घरावर 'गद्दार' असे लिहून रोष व्यक्त केला. या वेळी घोषणा देताना काही जणांनी जिल्हा सहकारी बँकेतील राष्ट्रवादीच्या पराभवालाही फाळके हेच जबाबदार असल्याचा आरोप केला. या प्रकारामुळे जिल्ह्यात विविध प्रकारची चर्चा सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या कर्जत बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष आणि आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडी अशी लढत झाली. त्यात भाजप व आघाडीचे प्रत्येकी 9-9 उमेदवार विजयी झाले. संचालकांचे समान बलाबल झाल्याने सभापती व उपसभापती या पदांच्या निवडणुकीबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.
त्याआधी जामखेड बाजार समितीतही समान बलाबल असताना सभापतिपद भाजपला आणि उपसभापतिपद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले. त्या पार्श्वभूमीवर कर्जतकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कर्जत बाजार समिती पदाधिकार्यांसाठी रविवारी (दि.11) निवडणूक झाली. त्यात सभापती पदासाठीच्या मतदानात राष्ट्रवादीच्या एका सचालकाने दोन्ही उमेदवारांच्या नावापुढे शिक्के मारल्याने ते मत बाद झाले आणि सभापती पदावर भाजपचा झेंडा फडकला.
उपसभापती पदाच्या निवडणुकीत तर राष्ट्रवादीचे एक मत फुटले व भाजपच्या उमेदवाराला दहा मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसला दोन्ही पदांवर पराभव सहन करावा लागला. त्यामुळे मत बाद करणारा आणि भाजपला मतदान करणारा एकच संचालक असल्याचा, या फोडाफोडीला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांची फूस असल्याचा, तसेच फाळके समर्थक संचालकच फुटल्याचा आरोप करण्यात आला. त्यातून आज (मंगळवारी) पक्षाच्या कर्जत तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी फाळके यांच्या कर्जत येथील निवासस्थानासमोर जोरदार निदर्शने केली. तेथील भिंतीवर 'गद्दार' असे लिहून निषेधही केला.
जिल्हा बँकेच्या पदाधिकारी निवडणुकीतही राष्ट्रवादीची मते फुटल्याने भाजपचा विजय झाला आणि माजी आमदार शिवाजी कर्डिले अध्यक्ष झाले, त्या वेळीही फाळके समर्थक संचालकच फुटल्याची चर्चा आहे. त्या फुटीलाही राजेंद्र फाळके हेच जबाबदार असल्याचा आरोप आज कार्यकर्त्यांनी केला. 'रोहित पवार झिंदाबाद, गद्दार मुर्दाबाद' अशा घोषणा या वेळी देण्यात येत होत्या.
हे ही वाचा :