नगर : सोनसाखळी चोरांचा धुडगूस ! दीड वर्षात 140 घटना; पोलिसांची नाकाबंदी ‘फेल’

श्रीकांत राऊत : 

नगर : शहरासह जिल्ह्यात महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणार्‍या चोरट्यांनी सुळसुळाट झाला आहे. गेल्या दीड वर्षात जिल्हाभरात चेन स्नॅचिंगच्या सुमारे 140 घटना घडल्या आहेत. यातील सुमारे 50 गुन्हे नगर शहरात घडले आहेत. विशेष म्हणजे नगर शहरातील उपनगरांमध्ये गेल्या महिनाभरापासून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलांचे दागिने हिसकावण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र, पोलिसांना या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात अपयश येत आहे.

घरफोडी, दुचाकीचोरीच्या घटनांचे सत्र सुरूच असताना सोनसाखळी चोरांनी डोके वर काढले आहे. जिल्हाभरात जानेवारी 2022 पासून ते मे 2023 अखेर चेन स्नॅचिंगचे 140 गुन्हे दाखल झाले आहेत. गेल्या पाच महिन्यांत चेन स्नॅचिंगच्या सुमारे 40 घटना घडल्या आहेत. यात सर्वाधिक 30 गुन्हे तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उपनगरांमध्ये घडले आहेत. गोरगरीब महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचे प्रमाण वाढल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मॉर्निंग वॉकला जाणार्‍या, तसेच एकट्या महिलेला टार्गेट करून दागिने हिसकावले जात आहेत. चेन स्नॅचिंग करून चोरटे पोलिसांना सलामी ठोकत आहेत. दिवसाढवळ्या महिलांचे दागिने ओरबाडून नेले जात असल्याने चोरट्यांना पोलिसांचा धाक उरला नसल्याचे चित्र तयार झाले आहे. दुचाकीस्वार लुटारूंनी एकप्रकारे नगर पोलिसांना चॅलेंज दिल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

गुन्हे वाढले 'डिटेक्शन' घटले !
चेन स्नॅचिंगचे गुन्हे पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. गुन्ह्यातील आरोपी बहुतांश वेळा जिल्ह्याबाहेरील असल्याने गुन्ह्यांचा तपास करण्यात पोलिसांना अडचणी येतात. चेन स्नॅचिंगच्या घटना वाढत असतानाच गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण घटल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

बोलण्यात गुंतवून मंगळसूत्र ओरबाडले
पाईपलाईन रस्त्यावर उषा अनिल सहस्रबुद्धे (वय 70) यांना शुक्रवारी (दि. 9) दुचाकीवरून आलेल्या तिघांनी बोलण्यात गुंतवून मंगळसूत्र ओरबाडून नेले. आरोपींचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले आहेत. अशाच पाच घटना तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या महिनाभरात घडल्या आहेत.

पोलिस ठाणेनिहाय गुन्हे
कोतवाली-15, तोफखाना-24, भिंगार-6, नगर तालुका-1, एमआयडीसी-1, सुपा-3, श्रीरामपूर शहर-12, श्रीरामपूर तालुका-2, राहुरी-9, संगमनेर शहर-12, संगमनेर तालुका-3, घारगाव-1, आश्वी-1, कोपरगाव शहर-4, कोपरगाव तालुका-1, शिर्डी-20, राहता-2, लोणी-7, शेवगाव-5, पाथर्डी-3, नेवासा-4, सोनई-2, कर्जत-1, जामखेड-1

महिलांनी भूलथापांना बळी पडू नये
महिलांनी स्वतःहून खबरदारी घ्यावी.
मॉर्निंग वॉकला जाताना दागिने बाळगू नये.
वृद्ध महिलांनी सार्वजनिक ठिकाणी काळजी घ्यावी.
अनोळखी लोकांपासून सावध राहा.
पत्ता विचारणार्‍यांशी बोलणे टाळा किंवा दुरून बोला
विनाक्रमांकाच्या वाहनांची पोलिसांना माहिती द्या.
निर्जनस्थळी जाताना सावध राहा.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news