क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक पडली 35 लाखांना ; जास्तीचे पैसे मिळवून देतो म्हणत चौघांना गंडा | पुढारी

क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक पडली 35 लाखांना ; जास्तीचे पैसे मिळवून देतो म्हणत चौघांना गंडा

नेवासा (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  क्रिप्टोकरन्सीमध्ये जास्त पैसे कमवून देतो म्हणत नेवासा तालुक्यातील चौघांची 35 लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी बीड जिल्ह्यातील माणिक शेषराव राठोड व त्याची पत्नी शिलू राठोड यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बापू लांडगे (रा. बकुपिंपळगाव, ता.नेवासा) यांनी फिर्याद दिली आहे. यात म्हटले की, बापू लांडगे व आकाश सातपुते (रा.गंगापूर) यांची मागील दोन वर्षांपासून ओळख असून, सातपुते हा क्रिप्टोकरन्सीमध्ये काम करतो. सातपुते व लांडगे यांची एक दिवस भेट झाली. या दरम्यान माणिक शेषराव राठोड (रा. मांडखेल, ता.परळी) हा क्रिप्टोकरन्सीमध्ये काम करत असून, तो क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे टाकून जास्त पैसे कमावून देतो, असे सातपुतेने लांडगे यांना सांगितले.

राठोडला नेवासा फाटा येथे बोलावून त्याला भेटायला बापू लांडगे, सुरेश यशवंत जाधव (रा.नेवासा फाटा, ता.नेवासा), सोमनाथ कचरू वरकड (रा. बकुपिंपळगाव, ता.नेवासा), अजय दामोदर साबळे(रा. मुरमे, ता.नेवासा), बाळासाहेब सारंगधर पेहरे (रा.भानसहिवरा ता.नेवासा), स्वप्नील जाधव (रा.भानसहिवरा ता.नेवासा), चंद्रकांत बर्‍हाटे (रा.घोडेगाव, ता.नेवासा), संतोष नरसिंग (रा.निमगाव म्हाळुंगे, ता.शिरूर) हे सर्व गेले. यावेळी राठोडने क्रिप्टोकरन्सी, तसेच उइद कॉइनबाबत माहिती देत उइदच्या कॉइनला एक आईडी असतो, तो सहा लाखांचा असल्याचे सांगितले.

तो खरेदी केल्यास दोनशे दिवस दररोज पाच हजार रुपयांचे कॉइन येतील. त्याप्रमाणे वेळोवेळी लोकांनी पैसे भरले. ज्यात एकूण 34 लाख 58 हजार 833 रुपये क्रिप्टोकरन्सीच्या नावाने राठोड पती-पत्नीच्या खात्यावर व फोन पे क्रमांकावर पाठविले; मात्र पाठवलेल्या रकमेचा कोणताही परतावा दिला नाही. तसेच, सांगितल्या प्रमाणे कोणतेही पैसे लांडगे व इतरांना मिळाले नाही. पैसे आज देतो उद्या देतो म्हणून टाळाटाळ करत असून, फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी माणिक शेषराव राठोड व त्याची पत्नी शिलू राठोड (रा.मांडखेल, ता.परळी) या दोघांविरोधात नेवासा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

असे भरले वेळोवेळी पैसे!
सांगण्यावर विश्वास ठेवून त्याची पत्नी शिलू राठोड हिच्या फोन पे नंबर, तसेच बँक खात्यावर 15 नोव्हेंबर 2021 ते 24 मे 2022 दरम्यान चार लाख 73 हजार रुपये पाठविले. त्याचप्रमाणे सुरेश यशवंत जाधव यांनी राठोडच्या बँक खात्यावर 22 लाख 97 हजार 333 रुपये, अजय दामोदर साबळे यांनी बँक खाते व फोन पेवर तीन लाख 48 हजार 500 रुपये, तसेच सोमनाथ वरकड यांनी तीन लाख 80 हजार रुपये.

हे ही वाचा : 

Kolhapur | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा रद्द, जाणून घ्या कारण

ही मुख्यमंत्री शिंदेची मोठी झेप, जाहिरातीवरुन भुजबळांची खोचक टीका 

Back to top button