कर्जत बाजार समिती : राम शिंदेंचा रोहित पवारांना धक्का | पुढारी

कर्जत बाजार समिती : राम शिंदेंचा रोहित पवारांना धक्का

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : कर्जत बाजार समिती पदाधिकारी निवडणुकीत आमदार राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का दिला. संचालकांचे 9-9 असे समान बलाबल असताना राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे एक मत फोडून भाजपने सभापती व उपसभापती या दोन्ही पदांवर विजय मिळविला. सभापती निवडणुकीत आघाडीचे एक मत बाद झाले. मात्र, उपसभापती निवडणुकीत आघाडीचे एक मत ़फुटलेच. त्यामुळे बाद झालेल्या मताबाबत आश्चर्य व्यक्त होत असतानाच, फुटलेल्या मतामुळे मोठा धक्का आमदार पवार यांना बसला. हे मत फोडून शिंदे यांनी पवारांवर कुरघोडी केल्याचे मानले जात आहे.

कर्जत बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीची निवडणूक रविवारी (दि.11) झाली. त्यात सभापती पदासाठी भाजपकडून काकासाहेब तापकीर आणि राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीकडून गुलाब तनपुरे यांनी, तर उपसभापती पदासाठी भाजपकडून आबासाहेब पाटील आणि आघाडीकडून अ‍ॅड. हर्ष शेवाळे यांनी उमेदवारी अर्ज भरलेे. छाननीत सर्व अर्ज वैध ठरले. दोन्ही पदांसाठी गुप्त पद्धतीने मतदान झाले. त्यात तापकीर यांना नऊ मते मिळाली, तर तनपुरे यांना फक्त आठ मते मिळाली. आघाडीचे एक मत बाद ठरले. त्यामुळे सभापती पदावर भाजपचे काकासाहेब तापकीर एक मताने विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी जाहीर केले. हा महाविकास आघाडी आणि त्याचे नेतृत्व करणार्‍या आमदार रोहित पवार यांच्यासाठी धक्का होता.

यानंतर उपसभापती पदासाठी भाजपचे पाटील व आघाडीचे अ‍ॅड. शेवाळे यांच्यासाठी मतदान झाले. त्यात पाटील यांना 10 मते, तर शेवाळे यांना केवळ आठ मते मिळाली. त्यामुळे येथे महाविकास आघाडीचे एक मत फुटल्याचे स्पष्ट झाले आणि भाजपचे अभय पाटील यांना दोन मतांनी विजयी घोषित करण्यात आले.

संबंधित बातम्या

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयामध्ये ही निवडणूक झाली. या वेळी कार्यालयाच्या बाहेर भाजप व महाविकास आघाडीचे समर्थक मोठ्या संख्येने जमले होते. निकाल जाहीर होताच भाजपने जल्लोष केला. आमदार राम शिंदे यांचे आगमन झाल्यानंतर त्यांची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुखदेव सूर्यवंशी यांनी काम पाहिले. या निवडणुकीसाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, उपसभापतिपदी विजयी झालेले आबासाहेब पाटील यांचा आज वाढदिवस होता. त्यांचा विजय म्हणजे वाढदिवसाची भेट मानली जात आहे.

फुटलेला तो संचालक कोण?
उपसभापती निवडणुकीत आघाडीचे कुणाचे मत फुटले, याची जोरदार चर्चा सुरू आहे. सभापती निवडणुकीत एका संचालकाने तापकीर व तनपुरे या दोघांच्याही नावापुढे शिक्के मारल्याने ते बाद झाले.
हे मत जाणूनबुजून बाद करण्यात आल्याची चर्चा आहे. मत बाद करणारा आणि विरोधात मतदान करणारा आघाडीचा संचालक एकच असावा, अशी शंका असून, फुटलेला तो संचालक कोण, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.

राष्ट्रवादीला तिसरा धक्का
कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस व आमदार रोहित पवार यांना हा सलग पंधरा दिवसांत दिलेला तिसरा धक्का आहे. जामखेड बाजार समिती, खर्डा ग्रामपंचायत आणि आता कर्जत बाजार समिती, असे सलग तीन विजय मिळवून भाजपने राष्ट्रवादीला धक्का दिल्याचे आमदार राम शिंदे यांनी सांगितले.

भाजपसोबतच राहणार : तापकीर
निवडणुकीमध्ये विजय मिळणार याची पूर्णपणे खात्री होती. आजचा विजय आमदार राम शिंदे, खासदार डॉ. सुजय विखे, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ व सर्व संचालकांच्या मदतीने मिळाला आहे. आपण आता भाजपबरोबर आहोत आणि त्या पक्षासोबतच प्रामाणिकपणे राहणार आहोत, असे काकासाहेब तापकीर यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

अविरत इंटरनेटसाठी ‘नासा’चे नवे मिशन

जैविक अस्त्र बनवताना कोरोना विषाणू ‘लिक’?

कोल्हापूर : उद्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’

Back to top button