नगर : वादळाने मोहरी परिसरात दाणादाण | पुढारी

नगर : वादळाने मोहरी परिसरात दाणादाण

पाथर्डी तालुका (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील डमाळवाडी, मोहरी परिसरात वादळाने अनेक घरांची पडझड झाली. शुक्रवारी सायंकाळी सातनंतर तालुक्यात बर्‍याच ठिकाणी वादळी वार्‍यामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते.
मोहरी व डमाळवाडी येथील अनेक घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. माणिकदौंडी, कारेगाव, कुत्तरवाडी या भागात हलका पाऊस कोसळला. वादळामुळे अनेक गावाची वीज खंडित झाली होती. शहरात विजेचा लपंडाव बराच काळ सुरू होता. तालुक्यातील अनेक गावांत बारा तासांहून अधिक वीजपुरवठा खंडित झाला होता. दुपारी उशिरानंतर हा वीजपुरवठा महावितरणच्या कर्मचार्‍यांकडून सुरळीत करण्यात आला.

गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेची लाट पसरल्यानंतर शनिवारी हवामानात बदल झाला असून, ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उकाडा वाढला होता. शुक्रवारी रात्री झालेल्या वादळाने विजेच्या तारा, घरांचे पत्रे, घरासमोर पडव्या, जनावरांच्या गोठ्यांचे छत, फळबागांचे मोठे नुकसान झाले. आता लोकांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे. मात्र, पाऊस येण्यापूर्वी वादळाने अनेकदा तालुक्यातील शेती व मालमत्तेचे नुकसान झाले आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळी पाथर्डी तालुक्यात साकेगाव, भालगाव, खरवंडी, मिडसांगवी, मालेवाडी, पागोरी पिंपळगाव या भागात वादळी पाऊस झाला आहे.

हे ही वाचा :

Ashadhi Wari 2023 : वारीची माहिती आता एका क्लिकवर; हे मोबाईल अ‍ॅप करा डाऊनलोड ?

Ashadhi wari 2023 : माउलींच्या पालखीचे आज प्रस्थान; असा असेल सोहळ्याचा दिनक्रम ? वाचा सविस्तर

Back to top button