नगर : शेतकरी रोखण्यासाठी समुपदेशन केंद्र ; शेतकरी पुत्र बाळासाहेब कोळसे यांचा अभिनव उपक्रम | पुढारी

नगर : शेतकरी रोखण्यासाठी समुपदेशन केंद्र ; शेतकरी पुत्र बाळासाहेब कोळसे यांचा अभिनव उपक्रम

करंजी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  शेतकर्‍यांच्या आत्महत्या टाळण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथील बाळासाहेब बाबुराव कोळसे या शेतकर्‍याच्या मुलाने महाराष्ट्रातील पहिले शेतकरी समुपदेशन केंद्र स्थापन केले आहे. याबाबत कोळसे यांनी जिल्हाधिकार्‍यांची नुकतीच भेट घेतली आहे. शेतीचा उत्पादन खर्च आणि त्यातून मिळणारे उत्पन्न व मार्केटमध्ये मिळणारा कवडीमोल बाजारभाव याचा ताळेबंद वर्षानुवर्षे बसत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतात. महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. नैसर्गिक संकटात सापडून बळीराजा उद्ध्वस्त होत आहे व त्याकडे शासन व्यवस्था दुर्लक्ष करत आहे. राज्यकर्त्यांनी आपसातील मतभेद विसरून बळीराजाला वाचविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन करत बाळासाहेब कोळसे यांनी सन 2021-2022 मध्ये महाराष्ट्रभर सहा हजार किलोमीटरचा सायकल प्रवास करून 36 जिल्ह्यातील जिल्हाधिकार्‍यांना शेतकरी आत्महत्यांबाबत निवेदन दिले. आत्महत्या झाल्यानंतर शेतकर्‍यांना मदत करण्यापेक्षा आत्महत्यापूर्व उपाययोजना करण्यात याव्यात, असे निवेदनात म्हटले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रभर सायकल भ्रमंती करत शेतकर्‍यांनी आत्महत्या करू नये, मृत्यूला न कवटाळता लढा देण्यासाठी तयार रहावे. आत्महत्यांनी प्रश्न सुटत नाहीत तर परिवार उघड्यावर येतो, असे आवाहान कोळसे यांनी जनजागृतीतून केले. सरकारने त्यांच्या पत्राची दखल न घेतल्याने कोळसे यांनी स्वतः पुढाकार घेत लाईफ लाईन फाउंडेशन (शेतकरी समुपदेशन केंद्र) ही संस्था व क्रांतिकारी शेतकरी संघ स्थापन केला आहे. तणावग्रस्त शेतकर्‍यांसाठी हेल्पलाइन सेवा सुरू केली आहे. कोळसे जिल्ह्यातील 14 तालुक्यांत गावोगावी जाऊन आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबाला भेटी देत त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना धीर देत आहेत. त्यांनी 6 जून रोजी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची भेट घेत, शेतकरी समस्या त्यांच्यासमोर मांडल्या व या कार्यात सहकार्य करण्याची विनंती केली.

बालसंगोपन योजना लागू करा
बालसंगोपन योजनेची लोकांना माहितीच नसल्याने अनेक बालके या लाभापासून वंचित राहत आहेत. ही योजना आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांसाठी सरसकट लागू करण्यात यावी. अशी मागणीही कोळसे यांनी जिल्हाधिकारी सालीमठ यांच्याकडे केली आहे.

हे ही वाचा : 

आर्क्टिक महासागरातील बर्फ 2030 पर्यंत नष्ट होणार?

ओम यांनी क्रितीचा किस घेतल्याने वाद

 

Back to top button