नगर : कामरगावात जलजीवन योजनेचे काम रखडले | पुढारी

नगर : कामरगावात जलजीवन योजनेचे काम रखडले

वाळकी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील कामरगाव येथे दोन कोटींची जलजीवन योजना मंजूर झाली असून, या योजनेचा शुभारंभ खासदार व आमदारांनी धूमधडाक्यात केला. ठेकेदाराने या योजनेचे जुजबी काम सुरु केले असून, एक महिन्यापासून काम बंद पडले आहे. काम चार दिवसांत सुरू न झाल्यास नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
माजी सरपंच वसंतराव ठोकळ, सरपंच तुकाराम कातोरे,अ‍ॅड.प्रशांत साठे व ग्रामपंचायत सदस्यांनी याबाबत अधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेल्या कामरगावसाठी जलजीवन योजना मंजूर झाली असून, हर घर जल योजना या शासनाच्या महत्वकांक्षी योजनेतून माणसी 55 लिटर शुद्ध व स्वच्छ पाणी देण्याचे नियोजन आहे. परंतु, सध्या योजनेचे सुरू असलेले काम ठेकेदाराने बंद केले आहे. पाण्याच्या टाकीचे काम अर्धवट सोडले आहे. जागोजागी पाईपलाईनचे काम केले असून, काही ठिकाणी खड्डे बुजविलेले नाहीत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

काम सुरु करण्याबाबत ठेकेदाराशी संपर्क केला असता ते फोन उचलत नाहीत. योजनेवर नियंत्रण ठेवणारे पर्यवेक्षक यंत्रणेचे अधिकारी दखल घेत नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीरंग गडधे व उपकार्यकारी अभियंता रवींद्र पानसंबळ यांची भेट घेऊन योजनेतील त्रूटीबाबत चर्चा केली. गडधे व पानसंबळ यांनी शिष्टमंडळाला समाधानकारक उत्तरे दिली व संबधितांना तात्काळ काम सुरु करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, काम सुरू न झाल्यास नगर-पुणे महामार्गावर कामरगाव येथे हजारो ग्रामस्थांसोबत आंदोलन करण्याचा इशारा शिष्टमंडळाने दिला आहे. फ

जलजीवन योजनेतून गावाची कायमस्वरुपी तहान भागणार आहे. ग्रामस्थ ठेकेदाराला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत. मात्र, ठेकदाराने उदासीनता सोडण्याची गरज आहे.
                                                – वसंतराव ठोकळ, माजी सरपंच, कामरगाव

 हे ही वाचा :

https://pudhari.news/international/565081/will-a-criminal-case-be-filed-against-trump-read-what-is-the-matter/ar

https://pudhari.news/features/arogya/564420/the-disease-of-eating-more-than-hunger/ar

https://pudhari.news/maharashtra/nashik/565090/construction-of-the-controversial-tipu-sultan-chowk-in-dhule-has-begun/ar

Back to top button