राहुरी : शेतकर्‍यांची कांद्याऐवजी खरीप पिकांना पसंती | पुढारी

राहुरी : शेतकर्‍यांची कांद्याऐवजी खरीप पिकांना पसंती

रियाज देशमुख

राहुरी(अहमदनगर) : कांद्याने शेतकर्‍यांचा वांदा केल्याने शेतातील कांदा रस्त्यावर फेकून देत शेतकर्‍यांनी मनस्ताप व्यक्त केला. याचा परिणाम खरीप हंगामात दिसून येत आहे. यंदाच्या खरीप हंगामाची कृषी विभागाकडून जय्यत तयारी सुरू असताना शेतकरी कांदा पिकाकडे न वळता खरिपातील इतर पिकांना पसंती देत आहे. राहुरी कृषी विभागाने यंदा 39 हजार 450 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकाच्या खते, बियाणे व औषधांचे नियोजन केले आहे. ऊसाचा आगार समजला जाणारा राहुरी तालुका अल्पकाळात अधिक उत्पादन देणार्‍या कांद्यावर मागील वर्षी पसंती दिली. परंतु कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळल्याने काहींनी कांदा रस्त्यावर फेकून दिला तर काहींनी उभ्या पिकावर नांगर फिरवला.

तालुक्यामध्ये यंदा 39 हजार 450 हेक्टरवर खरीप पिकाचे नियोजन करताना कृषी विभागाने सोयाबीन बियाणांची कमतरता भासणार नाही याची विशेष काळजी घेतलेली आहे. ज्वारी व कापूस याबाबत कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट केले आहे. शेतकर्‍यांनी कापूस वाणांची उत्पादनक्षमता सारखीच आहे. त्यामुळे सर्वांनी सारखेच वाणांची मागणी न करता वेगवेगळ्या वाणांची मागणी करत उत्पादन घेण्याचे आवाहन केले आहे.

खरीप काळात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून कृषी सेवा केंद्रामध्ये भरारी पथके पाठविणे, अतिरिक्त दर घेणारे तसेच काळा बाजार करणार्‍यांवर कारवाई करण्याचे काम सुरू आहे. राहुरी हद्दीमध्ये खरिपामध्ये शेतकर्‍यांकडून बाजरी, कापूस, मका, तूर, मूग, भुईमूग, सोयाबीन, ऊस लागवडीची लगबग दिसून येत आहे. हवामान खात्यानेही समाधानकारक पाऊस सांगितल्याने शेतकर्‍यांचा आत्मविश्वास वाढला आहे.

मागील वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने मुळासह भंडारदरा पूर्ण क्षमतेने भरले होते. परिणामी ऐन उन्हाळ्यातही राहुरीकरांना दोन्ही धरणातून मुबलक प्रमाणात आवर्तने मिळाल्याने लाभ झाला. परंतु अवकाळी पावसाने दगा दिल्याने पिकांचे चांगलेच नुकसान झाले. कांदा पिकाला तर सर्वाधिक तोटा सहन बसला. अवकाळी पावसातही कसाबसा जगविलेल्या कांद्याला मात्र काडीमोड दर मिळाल्याने शेतकरी संतप्त दिसून आला आहे. त्यामुळे बियाणे खरेदी करताना यंदा खरिपात कमी काळात अधिक उत्पादन देणार्‍या कांदा बियाणे नको रे बाबा म्हणत ऊस, सोयाबीन, कापूस व बाजरी पिकाकडे वळल्याचे चित्र आहे. यामुळे या पिकांचे क्षेत्र वाढणार आहे.

यंदाचे खरिपाचे 39 हजार 450 हेक्टर उद्दिष्ट

एकूण -39 हजार 450 हेक्टर, बाजरी- 7 हजार 500 हेक्टर, मका- 3 हजार हेक्टर, तूर – 250 हेक्टर, मूग- 700 हेक्टर, भुईमूग- 500 हेक्टर, सोयाबीन-11 हजार हेक्टर, कापूस- 15 हजार हेक्टर, ऊस- 3 हजार हेक्टर एवढे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा

श्रीरामपूर : निळवंडेच्या पाण्याने दुष्काळी भागाचे परिवर्तन होणार ; आ. थोरात

फ्लोरिडात सापडले 60 लाख वर्षांपूर्वीच्या हत्तींचे अनेक अवशेष

नाशिक : जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सिंधी समाज आक्रमक

Back to top button