पाथर्डी तालुक्यात वादळी वार्‍यामुळे कोसळले टोलनाक्याचे शेड; 7 कर्मचारी बालबाल बचावले | पुढारी

पाथर्डी तालुक्यात वादळी वार्‍यामुळे कोसळले टोलनाक्याचे शेड; 7 कर्मचारी बालबाल बचावले

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याच्या काही भागात रविवारी (दि.4) दुपारी वादळी वार्‍यासह मान्सूनपूर्व पावसाने थैमान घातले. त्यात शेतकर्‍यांची धांदल उडाली. श्रीगोंदा, नेवासा, जामखेड या तालुक्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. पाथर्डी तालुक्यातील बडेवाडी येथे कल्याण-विशाखापट्टणम् महामार्गावरील टोलनाक्याचे शेड रस्त्यावरच कोसळले. दुपारची वेळ असल्याने वाहनांची फारशी वर्दळ नव्हती. आतील लोखंडी कैचीमुळे कर्मचारी बालबाल बचावले.

महामार्गावरील येळी गावापासून खरवंडीच्या दिशेने सुमारे तीन किलोमीटर अंतरावर हा टोलप्लाझा आहे. नागपूरच्या अस्मी रोड कॅरिअरकडून तेथे टोलवसुली होते. त्यासाठी त्यांनी स्थानिक एजंटाची नियुक्ती केली आहे. एकूण चार लेन व दोन सबलेन आहेत. दुपारी अडीचच्या सुमारास वादळाला सुरुवात झाली. पाच-सहा मिनिटांमध्ये संपूर्ण शेड जोराचा आवाज करत कोसळले.

ज्या बाजूला कर्मचारी होते त्या बाजूला लोखंडी अँगलवर पत्रे लटकून राहिले. त्यामुळे कर्मचार्‍यांना कसलीही इजा झाली नाही, असे व्यवस्थापक पप्पू खोडे यांनी सांगितले. परिसरातील लोकांच्या म्हणण्यानुसार टोल नाक्यावरील शेड चार वर्षांपूर्वी अन्य ठिकाणाहून जुने शेड आणून हा टोल नाका सुरू करण्याची घाई करण्यात आली. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न दुय्यम ठरला.

हेही वाचा

बारामतीतील प्रशासकिय भवनाच्या प्रवेशद्वारातच शेतकऱ्याने घेतले पेटवून

नाशिक क्राईम : चोरट्यांनी पळवले चक्क एटीएम मशीन

Back to top button