श्रीगोंदा : भावडीच्या सरपंच, ग्रामसेवकावर गुन्हा | पुढारी

श्रीगोंदा : भावडीच्या सरपंच, ग्रामसेवकावर गुन्हा

श्रीगोंदा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील भावडी ग्रामपंचायतमधील विविध कामातील निधीत अनियमीतता करत ग्रामनिधी, पाणी पुरवठा निधी, 15 वा वित्त आयोग, 14 वा वित्त आयोगाच्या निधीमधून वेळोवेळी धनादेशाद्वारे 21 लाख 23 हजार 352 रुपयांची रक्कम काढत गैरव्यवहार केल्याप्रकरणी सरपंच व तत्तकालीन ग्रामसेवकाविरुद्ध फसणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत विस्तार अधिकारी पोपट शहाजी यादव यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ग्रामसेवक अतिष दादासाहेब आखाडे व सरपंच धनश्री अर्जुन करनोर अशी आरोपींची नावे आहेत..

फिर्यादीनुसार तालुक्यातील भावडी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कामकाजाबाबत ग्रामस्थांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. गटविकास अधिकारी डॉ. राम जगताप यांनी शासकीय कामांची चौकशी करण्याचे सहा.गट विकास अधिकारी मनोज बनकर व विस्तार अधिकारी जी. जी. धांडे यांना आदेश दिले.

चौकशी सुरू असताना ग्रामसेवक आखाडे यांनी नमुना नंबर 1 ते 33 तसेच विहित विकासकामाच्या निविदा नस्ती, मूल्यांकन, काम पूर्णत्वाचा दाखला आदी दप्तर उपलब्ध करुन न दिल्याने 3 एप्रिल पर्यंत सरपंच व ग्रामसेवक यांनी कोणतेही म्हणणे सादर न केल्याने पुन्हा गटविकास अधिकार्‍यांनी ग्रामसेवक आणि विद्यमान सरंपचंना अंतिम कारणे दाखवा नोटीस दिली.

चौकशी अधिकारी सहा.गट विकास अधिकारी मनोज बनकर व विस्तार अधिकारी जी. जी. धांडे यांनी ग्रामपंचायतीच्या शासकीय बँक खात्याची माहिती घेऊन बँकेकडून स्टेटमेंट काढून नोंदी पहिल्या. त्यानुसार वेळोवेळी धनादेशाव्दारे रकमा काढल्याचे निदर्शनास आले. ग्रामपंचायत निधीतील 21 लाख 23 हजार 352 रुपयांचा गैरव्यवहार व अनियमीतता केल्याचा अहवाल जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना पाठविला. त्या नुसार ग्रामसेवक आखाडे व सरपंच करनोर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा

आळंदीत बुधवारपासून वाहनांना प्रवेशबंदी; या पर्यायी मार्गाचा करा वापर

अहमदनगर-सोलापूर महामार्गाचे काम बंद पाडले

मातृभाषा : अभिजात मराठी आणि भाषेविषयीची अनास्था

Back to top button