टेम्पोच्या धडकेत दोन महिला ठार; नगर-जामखेड रस्त्यावरील घटना | पुढारी

टेम्पोच्या धडकेत दोन महिला ठार; नगर-जामखेड रस्त्यावरील घटना

वाळकी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : जामखेडकडून नगरकडे भरधाव वेगात येणार्‍या टेम्पोने पायी जाणार्‍या दोन महिलांसह एका मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात दोन्ही महिलांचा मृत्यू झाला. तर, मोटारसायकलवरील पती-पत्नी व त्यांचा लहान मुलगा असे तिघेजण जखमी झाले आहेत. नगर-जामखेड रस्त्यावरील निंबोडीजवळ बुधवारी (दि.24) दुपारी साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला.

या अपघातात वत्सलाबाई भानुदास चांदणे यांचा जागीच मृत्यू झाला. तर, शकुंतला विजय चांदणे (दोघी रा. निंबोडी, ता.नगर) यांचा उपचारादरम्यान दवाखान्यात मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातात मोटारसायकलवर नगरहून निंबोडीकडे चाललेले सूरज जगन्नाथ शेंडगे, त्यांची पत्नी सपना सूरज शेंडगे व लहान मुलगा दक्ष सूरज शेंडगे (रा.लक्ष्मीनगर, निंबोडी, ता.नगर) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नगरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सपना शेंडगे यांनी भिंगार कॅम्प पोलिसांना जबाब दिला असून त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शेंडगे यांनी म्हटले आहे की, पती व मुलासह आम्ही तिघेजण नगरकडून निंबोडीकडे जात असताना गावाजवळ जामखेडकडून भरधाव आलेल्या टेम्पोने (एम.एच.16, ए.वाय.4160) रस्त्याने पायी चाललेल्या वत्सलाबाई चांदणे व शकुंतला चांदणे या दोघींना जोराची धडक दिली. त्यानंतर आमच्या मोटारसायकललाही समोरून धडक दिली. या अपघातानंतर तेथे जमा झालेल्या नागरिकांनी 108 रुग्णवाहिका बोलावून अपघातग्रस्तांना उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button