अहमदनगर : कोयत्याच्या धाकाने लुटणारे दोघे जेरबंद | पुढारी

अहमदनगर : कोयत्याच्या धाकाने लुटणारे दोघे जेरबंद

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : आगरकर मळा भागात तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून लुटणार्‍या दोन आरोपींना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. तत्पूर्वी, या लुटीतील ऐवज विकणार्‍याला व सुपारी देणार्‍या तीन अल्पवयीन मुलांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मंगेश कालिदत्त कांबळे (वय 19, रा. माधवनगर, केडगाव), लक्ष्मीकांत ऊर्फ बाबा प्रकाश कावळे (वय 24, रा.अयोध्यानगर, केडगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सूरज सुनील नायकवाडी (वय 17, रा. शिंदेगल्ली, माळीवाडा) हा तरुण त्याच्या मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना दोन जणांनी मागून येत त्यांना धक्का दिला.

दुचाकीचे नुकसान भरून देतो, असे सांगून दोघांना काही अंतरावर नेऊन कोयत्याचा धाक दाखवून सूरजच्या हातातील सोन्याच्या दोन अंगठ्या काढून घेतल्या होत्या. कोतवाली पोलिसांनी या लुटीची सुपारी देणार्‍या सूरजच्या तीन अल्पवयीन मित्रांना व लुटीतील ऐवज विकणार्‍याला ताब्यात घेतले होते. मात्र, मंगेश कांबळे व बाबा कावळे हे दोघे फरार होते.

केडगाव येथे दोन्ही आरोपी हळदीच्या समारंभास येणार असल्याची माहिती निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहेत.

Back to top button