श्रीरामपूर : महाविद्यालयीन तरुणीचा हात धरून रस्त्यात मारहाण | पुढारी

श्रीरामपूर : महाविद्यालयीन तरुणीचा हात धरून रस्त्यात मारहाण

श्रीरामपूर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : शहरात एका नामांकित महाविद्यालयात शिकणार्‍या 21 वर्षीय विद्यार्थिनीचा गेल्या महिनाभर पाठलाग करणार्‍या रोडरोमिओने भर रस्त्यात हात पकडून मारहाण केल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणी रोड रोमिओविरुद्ध शहर पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मोमीनपुरा भागात राहणारी शहरातील नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेणारी 21 वर्षीय विद्यार्थिनी बसस्थानकाकडे पायी जात होती. यावेळी फरहान सय्यद (रा. अलकानगर) याने तिला भरर स्त्यात अडवले. ‘मैं तुझसे प्यार करता हूँ,’असे म्हणत त्याने तिचा हात पकडला. या कृत्याला विरोध करीत तरुणीने, ‘मुझे तेरे साथ बात नहीं करनी,’ असे प्रत्त्युत्तर दिले. यामुळे राग अनावर झाल्याने रोडरोमिओने तिला भर रस्त्यात मारहाण केली.

यावर संतप्त झालेल्या त्या तरुणीने थेट शहर पोलिस ठाणे गाठले. झालेला प्रकार पोलिसांसमोर कथन केला. पोलिसांनी फरहान सय्यद (रा. अलकानगर, संगमनेर) याच्याविरोधात विनयभंगासह इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केला, मात्र या घटनेला एक दिवस उलटूनसुद्धा पोलिस त्याला पकडू शकले नाही, हे विशेष!

‘दामिनी’ पथकाचे संगमनेरात अस्तित्वच नाही..!

महिलांसह मुलींना सार्वजनिक ठिकाणी निर्भयतेने वावरता यावे, यासाठी राज्य सरकारने ‘दामिनी’ पथकांची निर्मिती करून स्वतंत्र अधिकारी व वाहनाची व्यवस्था केली, मात्र संगमनेरला या पथकाचे अस्तित्वच नसल्याचे दिसते. या निष्क्रियतेमुळे मनोबल वाढलेल्या टवाळखोर व रोडरोमिओंकडून शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात विद्यार्थिनींच्या छेडछाडीसह पाठलाग करण्याच्या घटनांमध्ये अलिकडे मोठी वाढ झाल्याचे दिवसेंदिवस घडलेल्या प्रकारांवरून उघड होत आहे.

Back to top button