नगर शहर व उपनगरात हुक्का पार्लरवर एलसीबीची छापेमारी ; 42 हजारांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

नगर शहर व उपनगरात हुक्का पार्लरवर एलसीबीची छापेमारी ; 42 हजारांचा मुद्देमाल जप्त

नगर : पुढारी वृत्तसेवा :  नगर शहर व उपनगरात अवैधरित्या विक्री होणारी ई-सिगारेट हुक्यांची तंबाखु व फ्लेवर तसेच हुक्का पार्लर चालविणार्‍यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापेमारी करत कारवाई केली. या कारवाईत 42 हजार 610 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चेतन बाबासाहेब खर्डे (वय 31, रा.प्रोफेसर चौक, सावेडी), प्रशांत गजानन सोनवणे (वय 32, रा. केडगाव, अहमदनगर), जुबेर फिरोज सय्यद (वय 19, रा. बोल्हेगांव), तेजस मिलिंद भिंगारदिवे (वय 20, रा. आर्यन कॉलनी, बोल्हेगाव), कृष्णा अशोक इंगळे (रा. सर्जेपुरा, अहमदनगर) (फरार) या पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील प्रोफेसर चौक ते प्रेमदान चौक रस्त्यावरील चेतन खर्डे याच्या पान फंडा नावाच्या दुकानात छापा टाकून ई-सिगारेट हुक्यांची तंबाखु पोलिसांनी जप्त केली.

तसेच, सर्जेपुरा येथील इंगळे आर्केडचे तळघरामध्ये कृष्णा इंगळे याच्या हुक्का पार्लरवर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलिस हवालदार मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, पोलिस नाईक रवींद्र कर्डीले, विशाल गवांदे, सचिन आडबल, रणजीत जाधव व सारीका दरेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Back to top button