नगर : निविष्ठा विक्रेत्यांची होणार तपासणी ; पालकमंत्री विखे शनिवारी घेणार खरीपपूर्व आढावा | पुढारी

नगर : निविष्ठा विक्रेत्यांची होणार तपासणी ; पालकमंत्री विखे शनिवारी घेणार खरीपपूर्व आढावा

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक शनिवारी (दि. 6) पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीत खरीप हंगामामध्ये शेतकर्‍यांना लागणारी बियाणे, खते व कीटकनाशके याबाबत कृषी विभागाने केलेल्या नियोजनाचा आढावा घेण्यात येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे. खरीप हंगाम सन 2023- 24 साठी शेतकर्‍यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरामध्ये पुरवठा होण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन केलेले आहे. शेतकर्‍यांची कमी दर्जाच्या निविष्ठांमुळे फसवणूक होऊ नये. यासाठी जिल्हास्तरावर 1 व प्रत्येक तालुकास्तरावर 1 अशी एकूण 15 भरारी पथके जिल्ह्यात नेमलेली आहेत.

या पथकांमार्फत निविष्ठा विक्रेत्यांची अचानक तपासणी केली जाणार आहे. बोगस निविष्ठा व जादा दराने निविष्ठांची विक्री केल्यास संबंधित विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. यामुळे शेतकर्‍यांची फसवणूक टळेल व अनधिकृतरित्या विक्री होणार्‍या बोगस बियाणे व खते विक्रीला लगाम घालण्यास मदत होणार असल्याचे बोराळे यांनी सांगितले. जिल्हा तसेच तालुकास्तरावर निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्षांची स्थापना केली असून, प्रत्येक तालुकास्तरावर तक्रार निवारण समिती कार्यरत केली. शेतकर्‍यांची निविष्ठा उपलब्धतेमध्ये अडचणी उद्भवल्यास तक्रार निवारण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे.

Back to top button