संगमनेर : अल्पवयीन मुलीला त्रास देणार्‍या तरुणास चोप! | पुढारी

संगमनेर : अल्पवयीन मुलीला त्रास देणार्‍या तरुणास चोप!

संगमनेर(नगर); पुढारी वृत्तसेवा : खासगी कुशन दुकानात काम करणार्‍या एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत तिला रस्त्यात अडवून सोबत चालण्याची गळ घालणार्‍या एका विकृताला तरुणांनी बेदम चोप देत अर्धमेल्या अवस्थेत शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी अमन सय्यद याच्या विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन, अटक केली.

शहर पोलिसांनी सांगितले की, शहरालगत उपनगरात राहणारी साडेसतरा वर्षांची एक अल्पवयीन मुलगी 12 वीच्या परीक्षा संपल्यामुळे नवीन नगर रस्त्यावरील एका खासगी कुशन दुकानात काम करीत होती. अमन शब्बीर सय्यद याने त्या दुकानासमोर 10 – 12 वेळा चकरा मारल्या. यानंतर ती मुलगी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घरी जात अस ताने तिचा पाठलाग केला.

नवीन नगर रस्त्यावर प्रशासकीय भवनाजवळ ती आली असता त्याने तिला अडविले. ती म्हणाली, ‘मी तुला ओळखत नाही. तू विनाकारण माझा पाठलाग का करतो. माझ्या नादाला लागू नको,’ असे म्हणत ती पुढे चालू लागली. त्याने तिला एका किराणा दुकानाजवळ पुन्हा अडविले. ‘माझ्यासोबत चालत रहा,’ असे तो तिला म्हणाल्याने ती घाबरली. तिने किराणा दुकानदारास, हा मुलगा मला त्रास देत आहे, असे सांगितले. किराणा दुकानदाराने त्याच्यावर काठी उगारली असता तो पळून गेला.

घरी गेल्यानंतर त्या अल्पवयीन मुलीने झालेला प्रकार तिच्या आईला सांगितला. यानंतर दुसर्‍या दिवशी गुरुवारी तिची आई व बहीण तिच्यासोबत आली. सायंकाळी पुन्हा घरी येत असताना मुलगी पुढे तर तिच्यामागे तिची बहीण व आई पायी चालत येत होती. विद्यानगरमधील काकड रुग्णालयाजवळ त्या आल्या असता तो मुलगा पुन्हा आला अन् त्या मुलीने बहिणीला फोन करुन पाठीमागून येत असलेला मुलगा तोच असल्याचे सांगताच तिच्या आईने त्याला पकडले. तिच्या बहिणीसह आईने व परिसरातील जमलेल्या लोकांनी त्यास येथेच्छ चोप दिला अन् पोलिसांच्या ताब्यात दिले.

दरम्यान, याप्रकरणी त्या अल्पवयीन मुलीने शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अमन शब्बीर सय्यद (रा. कब्रस्थानजवळ, नायकवाडपुरा, संगमनेर) या तरुणाच्याविरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्‍या कायद्याचे (पोक्सो) कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. तरुणास पोलिसांनी अटक केल्याने समाधान व्यक्त होत आहे.

Back to top button