दक्षिण जिल्ह्यात महामानवास अभिवादन ; नगरमध्ये मिरवणुकीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त | पुढारी

दक्षिण जिल्ह्यात महामानवास अभिवादन ; नगरमध्ये मिरवणुकीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त

नगर : पुढारी वृत्तसेवा :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती नगर शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पोलिस प्रशासनाकडून मिरवणूक मार्गावर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मिरवणुकीत लावण्यात आलेल्या डीजेवर तरुणाईने थिरकत जल्लोष साजरा केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणारी मिवरणूक निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी पोलिस प्रशासनाने नियोजन केले होते. मिरवणूक मार्गावर 45 ठिकाणी 70 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. त्यासोबतच संवेदशील भागात बॅरिकेटिंग करण्यात आले होते.

मिरवणुकीपूर्वी मंडळांचे अध्यक्ष व पोलिस प्रशासनाची बैठक देखील पार पडली होती. शुक्रवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणुकीला सुरूवात झाली. तसेच शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी ठीकठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळाली. शहरातून निघालेल्या मिरवणुकीत 15 मंडळांनी सहभाग घेतला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी रात्री उशिरापर्यंत तळ ठोकून होते.

Back to top button