काँग्रेसच्या जीवावर सत्तेचे स्वप्न पाहू नका ; महसूलमंत्री विखे पाटील

काँग्रेसच्या जीवावर सत्तेचे स्वप्न पाहू नका ; महसूलमंत्री विखे पाटील
Published on
Updated on

शिर्डी : प्रतिनिधी : सावरकरांप्रती उद्धव ठाकरेंची दुटप्पी भूमिका राज्यातल्या जनतेने ओळखली आहे. सावरकरांचा अपमान करणार्‍या या काँग्रेसच्या जीवावर तुम्ही सत्तेचे इमले बांधण्याचे स्वप्न पाहत असाल तर राज्यातील जनता ते कदापीही पूर्ण होऊ देणार नाही, अशी घणाघाती टीका महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. भारतीय जनता पक्षाच्यावतीने शिर्डी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील प्रमुख मार्गावरून मंत्री विखे पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी गौरव यात्रा काढून काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा तिव्र शब्दात निषेध केला.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, अभय शेळके, शहर अध्यक्ष सचिन शिंदे, कैलास कोते, मुकुंदराव सदाफळ, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर, स्वानंद रासणे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते. मंत्री विखे पाटील म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्याचा कोणताही इतिहास माहित नसलेले राहुल गांधी सावरकरांप्रती बेताल वक्तव्य करून, प्रसिद्धी मिळवित आहेत. सवंग लोकप्रियतेसाठी त्यांनी केलेले वक्तव्य म्हणजे संपूर्ण देशाचा अपमान आहे. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणार्‍या व्यक्तिंप्रती अपमानास्पद वक्तव्य करून तुम्ही भारत जोडत आहात की तोडत आहात? असा सवाल त्यांनी केला.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या यात्रेत भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कुठे शिवसेना प्रमुख आणि कुठे उद्धव ठाकरे?
सावरकरांचे बलिदान हा देश कधीही विसरु शकणार नाही. अंदमानच्या तुरुंगात त्यांना ज्या पध्दतीने वागविले गेले तो इतिहास अंगावर शहारे आणणारा आहे. पण हा इतिहास ज्यांना ज्ञात नाही, ते काँग्रेसचे नेते स्वातंत्र्य लढ्यात योगदान देण्यार्‍यांप्रती प्रश्नचिन्ह उपस्थित करुन, राजकारण करतात अशी टीका करुन विखे पाटील यांनी सांगितले की, सावरकरांप्रती वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मणिशंकर अय्यर यांना रस्त्यावर उतरुन जोड्याने मारणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कुठे आणि सत्तेसाठी त्याच काँग्रेस नेत्यांना पायघड्या घालणारे उध्दव ठाकरे कुठे याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

काँग्रेसमध्ये वैफल्यग्रस्तता : मंत्री विखे पा.
उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये सत्ता गेल्याची वैफल्यग्रस्तता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली असून सावरकरांविरोधी बेताल विधान करून, सामाजिक, राजकीय वातावरण कलुशित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु हा अपमान सहन न करता सावरकरांचा गौरव करण्याचा प्रयत्न यात्रेच्या निमित्ताने भाजपने सुरू केला असल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news