घरात घुसून विनयभंग; नांदगावचे दोघे ताब्यात | पुढारी

घरात घुसून विनयभंग; नांदगावचे दोघे ताब्यात

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : तालुक्याच्या ग्रामीण भागातील एका गावात विवाहितेच्या घरात घुसून, ‘मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. तू माझ्याबरोबर चल,’ असे म्हणत तिचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. याप्रकरणी नांदगाव तालुक्यातील दोघांवर संगमनेर तालुका पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन, पोलिसांनी दोघांना अटक केली.

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील अक्षय अशोक शेरेकर (रा. वेहळगाव) व सचिन संजय घुगे (रा. मंगळणे) हे दोघे संगमनेर तालुक्यातील एका गावामध्ये आले. ते थेट तिच्या घरात घुसले. अक्षय शेरेकर तिला म्हणाला, ‘तू लग्नाला होकार कसा दिला. मला तुझ्याबरोबर लग्न करायचे होते. तू माझ्याबरोबर चल,’ असे म्हणत तिचा हात धरला. लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यावेळी विवाहितेस त्यांच्या तावडीतून सोडविण्यास जाऊबाई पुढे आली असता, सचिन घुगे याने तिला धक्काबुक्की करून ढकलून दिले.

विवाहितेला अक्षय व संजय म्हणाला, तू आमच्याबरोबर चल नाही तर तुझ्या वडिलासह भावाला भोकसून टाकू,’ अशी धमकी दिली.
याप्रकरणी विवाहितेने संगमनेर तालुका पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी दोन्ही तरुणांविरोधात महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करुन, अटक केली. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे व स. फौजदार रफिक पठाण हे करीत असल्याचे सांगण्यात आले आहे.

Back to top button