कर्जत-जामखेडचा ‘सीसीटीव्ही’मार्गी; निविदा प्रक्रिया राबविण्यास गृहमंत्री फडणवीस यांची मान्यता | पुढारी

कर्जत-जामखेडचा ‘सीसीटीव्ही’मार्गी; निविदा प्रक्रिया राबविण्यास गृहमंत्री फडणवीस यांची मान्यता

जामखेड/कर्जत; पुढारी वृत्तसेवा : कर्जत व जामखेड या शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या प्रयत्नांना आमदार रोहित पवार यांना यश आले आहे. याबाबत निविदा प्रक्रिया राबविण्यास उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. याबाबतची घोषणा त्यांनी गुरुवारी विधानसभेत केली.

वाहतूक नियमांचा भंग करणे, चोरी, महिला आणि मुलींची छेडछाड, यासह इतर गुन्ह्यांना आळा बसून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कर्जत व जामखेड या दोन्ही शहरांत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी आमदार पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती.

या प्रस्तावासंदर्भात अपर पोलिस महासंचालकांनी गृह विभागाच्या वायरलेस विभागाकडे पत्रव्यवहारही केला होता. त्यानुसार कर्जत-जामखेडमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने मंजुरी दिली आणि त्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला होता.

दरम्यान, राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर या कामाला स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती उठविण्यासाठी आमदार पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडेे पाठपुरावा केला. तसेच, विरोधी पक्षनेते अजित पवार यानीही ही बाब सरकारच्या लक्षात आणून दिली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या कामावरील स्थगिती उठविण्याची मागणी केली.

त्यानुसार ही स्थगिती उठवून निविदा प्रक्रिया राबविण्यास मंजुरी देण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत केली. सीसीटीव्ही प्रकल्पासाठी 6.37 कोटी रुपये मंजूर असून, लवकरच निविदा पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. त्यानुसार कर्जतमध्ये 49 ठिकाणी, तर जामखेडला 71 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.

कर्जत-जामखेड होणार अधिक सुरक्षित
गेल्या तीन वर्षांत आमदार पवार यांनी खर्डा आणि मिरजगाव या दोन नवीन पोलिस ठाण्यांना मंजुरी आणली. कुसडगाव येथे एसआरपीएफचे सेंटर सुरू केले. आता सीसीटीव्ही प्रकल्पामुळे नागरिकांना निर्भय वातावरणात काम करता येणार आहे.

Back to top button