नगर : डीजेचा दणदणाट अन् लेझर शो…! राशीनमध्ये शिवजयंती मिरवणुकीने फेडले डोळ्यांचे पारणे | पुढारी

नगर : डीजेचा दणदणाट अन् लेझर शो...! राशीनमध्ये शिवजयंती मिरवणुकीने फेडले डोळ्यांचे पारणे

राशीन : पुढारी वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील राशीन येथे शिवजयंतीनिमित्त सर्वत्र उत्साह संचारला होता. शिवरायांचा जयघोष करत डीजेच्या दणदणाटात तरुणाई सहभागी झाली होती. शिवजयंती निमित्त काढलेली मिरवणूक आणि लेझर शोने राशीनकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. मिरवणुकीत उंट, घोडे, हलगी पथक, ढोल पथक, शिवकालीन शस्त्र पथक, छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा, गगनभेदी शिवगर्जना आदींनी मिरवणूक लक्षवेधी ठरली. राशीन बसस्थानकापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मिरवणूक सुरू झाली. मिरवणुकीत विविध सामाजिक संघटना व पक्षांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आमदार राम शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

चार तास चाललेल्या मिरवणुकीचा आरती करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर समारोप करण्यात आला. यावेळी श्याम कानगुडे, विक्रम राजेभोसले यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला धनवडे बंधूंनी बुरुंजाची प्रतिकृती साकारून आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. मिरवणूक यशस्वीतेसाठी अजिंक्य राजेभोसले, किशोर कानगुडे, नवनाथ कानगुडे, सागर गुटाळ, विजय सुरवसे, अक्षय कानगुडे, अक्षय गायकवाड, केशव भंडारी, रोहित गायकवाड, बाबा कानगुडे, देव साळवे यांच्यासह सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी व शिवभक्तांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने शिवजयंती उत्साहात सहभागी झालेल्या ग्रामस्थांसाठी सरबत वाटपाची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.

Back to top button