नगर : एटीएममधील बॅटर्‍या चोरणार्‍यास केली अटक | पुढारी

नगर : एटीएममधील बॅटर्‍या चोरणार्‍यास केली अटक

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील सात्रळ येथील एटीएम मधील बॅटर्‍यांची चोरी करणार्‍यास एकास पोलिसांनी नेवासा तालुक्यातील सोनई येथून अटक करण्यात आली. मात्र एक अल्पवयीन आरोपी पसार झाला आहे. राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे दिनांक 24 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजे दरम्यान दोन अनोळखी तरुणांनी एटीएममधील तीन बॅटर्‍या चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. चोरीची ही सर्व घटना तेथे असलेल्या सीसीटिव्ही कॅमेर्‍यात कैद झालीय. या घटनेत आरोपींनी 15 हजार रुपए किमतीच्या तीन बॅटर्‍या चोरून नेल्या होत्या. मनोज रामदास साबळे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिस पथकाने एटीएममधील सीसीटिव्ही फुटेज मिळवून आरोपींचा शोध चालू केला होता. दरम्यान पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांना 27 फेब्रुवारी रोजी आरोपींचा सुगावा लागला. त्यांनी ताबडतोब राहुरी पोलिस ठाण्यातील हवालदार सोमनाथ जायभाय, पोलिस नाईक देविदास कोकाटे, सचिन ताजणे, नदिम शेख आदिंचे पथक तयार करुन रात्री दहा वाजे दरम्यान नेवासा तालुक्यातील सोनई परिसरात कारवाई करून आरोपी फरजोक फिरोज पठाण (वय 26, रा. सोनई) याला ताब्यात घेऊन गजाआड केले. आरोपीकडून चोरीच्या घटनेतील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पठाण याला न्यायालया समोर हजर केले असता त्याला 3 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सोमनाथ जायभाय हे करीत आहेत. पकडलेल्या चोरट्याकडे पोलिस चौकशी करीत आहेत.

Back to top button