नगर : ..तर जाहीर माफी मागायला तयार ! : अ‍ॅड. प्रताप ढाकणे | पुढारी

नगर : ..तर जाहीर माफी मागायला तयार ! : अ‍ॅड. प्रताप ढाकणे

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : गेल्या साडेआठ वर्षांपासून राजळे यांच्या भोवती एक विशिष्ट चांडाळ चौकडी गोळा झाली आहे. त्याचा त्रास संपूर्ण मतदारसंघाला भोगावा लागत आहे. आम्ही मागितलेला कामांचा हिशेब द्या, तो आम्हाला पटला, तर मी जाहीर माफी मागायला तयार आहे, असे आव्हान राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी आमदार मोनिका राजळे यांना दिले.
संवाद यात्रेनिमित्त खर्डे येथे सभेत ते बोलत होते. यावेळी शिवशंकर राजळे, बंडू बोरुडे, महारुद्र कीर्तने, नासिर शेख, भगवान दराडे, गहिनीनाथ शिरसाट, वैभव दहिफळे, हुमायून आतार, योगेश रासने, सविता भापकर आदी उपस्थित होते.

ढाकणे म्हणाले, तुम्ही बाराशे कोटी मतदारसंघात खर्च केल्याचा दावा केल्याने, आम्ही त्याचा हिशेब मागितला. निधी आणताय तर मग तो जातोय कुठे? आकडेवारीचे थोतांड थांबवा. लोक आमच्याकडे त्यांच्या व्यथा मांडतायेत. मग, तुम्ही साडेआठ वर्षांपासून नेमके काम काय केले, असा सवाल त्यांनी केला. कासार पिंपळगावचे रोहित्रसुध्दा मी मंजूर करून आणले. दुजाभाव करून व आडनावे पाहून तुम्ही ऊस तोडीला प्राधान्य देता, असा आरोपही ढाकणे यांनी केला. आभार बाबासाहेब सांगळे यांनी मानले.

Back to top button