नगर : सभापती पदासाठी गणेश कवडे यांचा अर्ज दाखल | पुढारी

नगर : सभापती पदासाठी गणेश कवडे यांचा अर्ज दाखल

नगर : पुढारी वृत्तसेवा : महापालिका स्थायी समिती सभापती पदासाठी ठरल्यानुसार मंगळवारी नगरसेवक गणेश कवडे यांनी दोन अर्ज घेतले आणि लगेच दुपारी दाखल केले. त्यामुळे सभापती पद शिवसेनेला मिळणार याला पुष्टी मिळाली. तर, सभागृहनेते पदही बदलण्याची शक्यता असून ते राष्ट्रवादीला मिळणार असल्याचे बोलले जाते. स्थायी समिती सभापतीपदासाठी गुरूवारी(दि. 2) निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरूवात झाली.

स्थायी समितीचे सदस्य, नगरसेवक गणेश कवडे यांनी दोन अर्ज खरेदी केले होते आणि अर्ज भरून महाविकास आघाडीतर्फे दाखल केले. यावेळी महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पा बोरूडे, नगसेवक विनीत पाऊलबुद्धे, श्याम नळकांडे, माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, नगसेविका सुवर्णा गेणप्पा, सुनीता कोतकर, नगरसेवक सुनील त्र्यंबके, मुदस्सर शेख, अमोल गाडे, संजय चोपडा आदी उपस्थित होते. नगरसचिव एस. बी. तडवी यांच्याकडे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले.

एका अर्जावर राष्ट्रवादी विनीत पाऊबुद्धे सूचक तर, शिवसेनेच्या मंगल लोखंडे अनुमोदक आहेत. दुसर्‍या अर्जावर शिवसेनेच्या सुवर्णा गेनप्पा सूचक ते सुनीता कोतकर अनुमोदक आहेत. बुधवारी(दि.1) दुपारी एक वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. गुरूवारी (दि.2) दुपारी निवडणूक होणार असून, प्रारंभी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे.

Back to top button