राहुरी : तू आमच्या घरातील भांडे चोरले, असे म्हणत तरुणाच्या डोक्यात वार | पुढारी

राहुरी : तू आमच्या घरातील भांडे चोरले, असे म्हणत तरुणाच्या डोक्यात वार

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : ‘तू आमच्या घरातील भांडे चोरले आहेत,’ असे म्हणत एका तरूणाच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरूणाची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राहुरी तालूक्यातील रेल्वे स्टेशन येथे (दि. 24 फेब्रुवारी) रोजी ही घटना घडली.दरम्यान, दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लिलाबाई शामराव गायकवाड (वय 65 वर्षे) मुलगा शंकर याच्यासह राहुरी तालुक्यातील राहुरी स्टेशन, गावठाण, येथे राहतात. त्यांचा दिर सावळेराम गायकवाड त्यांच्या शेजारी राहतो. (दि. 24) रोजी दुपारी साडेचार वाजे दरम्यान लिलाबाई गायकवाड, मुलगा व सून घरी असताना पुतण्या गोरख सावळेराम गायकवाड घरासमोर शिवीगाळ करीत आला. शंकर गायकवाड याला, ‘तू आमचे घरातील भांडे चोरले आहे, असे म्हणत गोरख याने शंकर गायकवाड याला मारहाण करण्यास सुरुवात केली.

लिलाबाई गायकवाड यांचा दिर सावळेराम गायकवाड हातात कुर्‍हाड घेवुन आला. ‘घरातील भांडे तुच चोरले,’असे म्हणत त्याने शंकर गायकवाड याच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार केला. लिलाबाई गायकवाड यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. ‘आमच्या नादी लागला तर काटा काढील, अशी जिवे मारण्याची धमकी दिली. शंकर गायकवाड याची प्रकृती चिंताजनक आहे. लिलाबाई गायकवाड यांच्या फिर्यादीवरून सावळेराम दगडू गायकवाड व गोरख सावळेराम गायकवाड या बाप लेकावर गुन्हा दाखल झाला आहे.

Back to top button