राहुरी : आरडा ओरड करु नका, असे म्हणत पती-पत्नी, मुलास बेदम मारहाण | पुढारी

राहुरी : आरडा ओरड करु नका, असे म्हणत पती-पत्नी, मुलास बेदम मारहाण

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : ‘आरडा ओरड करू नका, तुमच्यामुळे आम्हाला त्रास होतो,’ असे म्हणत पती, पत्नीसह मुलास गज व प्लास्टीक पाईपने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना राहुरी तालुक्यातील मानोरी येथे (दि.25 फेब्रुवारी) रोजी घडली. बालम मेहबुब शेख (वय 51 वर्षे) मानोरी येथे राहतात. मारहाण करणारे त्यांचे शेजारी आहेत. (दि. 25 फेब्रुवारी) रोजी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान बालम शेखसह पत्नी व मुलगा घरासमोर उभा होते.

यावेळी शेजारी तेथे आले. ‘तुम्ही आरडा ओरड करु नका, तुमच्यामुळे आम्हाला त्रास होत आहे,’ असे म्हणत शिवीगाळ करु लागले. यावर बालम शेख म्हणाले, ‘तुम्ही शिवीगाळ करुन वाद वाढवु नका.’ या बोलण्याचा राग आल्याने गज व प्लास्टीक पाईपने बालम शेखसह पत्नी व मुलास मारहाण केली. ‘पुन्हा आमच्या नादी लागले तर खुन करु,’ अशी धमकी दिली.

बालम शेख यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मेहमुद गफुर शेख व लकी मेहमुद शेख (दोघे रा. मानोरी, ता. राहुरी) या दोघांविरुद्ध मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा राहुरी पोलिसात दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Back to top button