पाथर्डी तालुका : सराफाला लुटणार्‍या तिघांना कोठडी | पुढारी

पाथर्डी तालुका : सराफाला लुटणार्‍या तिघांना कोठडी

पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : सराफ व्यावसायिकाला लुटणार्‍या तिघा आरोपींना पाथर्डीच्या न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपींनी गुन्हात लुटलेला मुद्देमाल, वापरलेले वाहन, तसेच हत्यारे जप्त करण्याबाबतचा युक्तिवाद पाथर्डी पोलिसांकडून करण्यात आला. या गुन्ह्यातील तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सचिन लिमकर यांनी काल या तीनही आरोपींना पाथर्डी न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मयूरसिंह गौतम यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्यांनतर तीनही आरोपींना 1 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

शहरातील सराफ बंडू उर्फ राजेंद्र चिंतामणी यांच्यावर हल्ला करून चोरट्यांनी लुटल्याप्रकरणी पोलिसांनी जलदगतीने तपास करून आरोपी विशाल शिवाजी एडके (पाथर्डी), दीपक दत्तात्रय राख (रा.केडगाव), दीपक तोताराम सोमनकर (राघूहिवरे) या तीन चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केले. न्यायालयासमोर सरकारी वकील प्रज्ञा गिते यांनी तसेच तपासी अधिकारी पोलिस उपनिरिक्षक सचिन लिमकर यांनी आरोपींनी आणखी कोणाच्या मदतीने गुन्हा केला. गुन्ह्यातील हत्यार, तसेच आणखी किती गुन्हे केले. याबाबत पुढील तपास करावयाचा असल्याने तीनही आरोपींना 7 दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायाधीश मयूरसिंह गौतम यांनी आरोपींना 1 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Back to top button