नगर: दहा हजाराची लाच स्वीकारताना वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

नगर: दहा हजाराची लाच स्वीकारताना वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
Published on: 
Updated on: 

राहुरी, पुढारी वृत्तसेवा: राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वृषाली सुर्यवंशी (कोरडे) या आपल्याच विभागात समुदाय आरोग्य अधिकारी महिलेकडून दहा हजार रूपयांची लाच घेताना चतुर्भूज झाल्या. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.

राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर गावामध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या डॉ. वृषाली तुळशिराम कोरडे (३९, रा. राहुरी) यांनी आपल्याच विभागात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरकडे लाचेची मागणी केली होती. ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२१ या दोन महिन्यांच्या कामावर आधारित मोबदला व प्रोत्साहन भत्ता मिळण्यासाठी तक्रारदार यांनी डॉ. वृषाली सुर्यवंशी यांची भेट घेत विचारणा केली होती. त्यानंतर त्यांनी मिळणार्‍या रक्कमेतून निम्मी रक्कम मला मिळावी अशी मागणी केली होती. पैशाची मागणी झाल्यानंतर दुसर्‍या भेटीत पुन्हा डॉ. सुर्यवंशी यांनी तू काही तरी रक्कम दे, तरच मी तुझ्या बिलासंबंधी पुढील प्रक्रिया करेल, असे सांगितल्याने तक्रारदार यांनी ४ हजार ५० रूपयांची रक्कम अदा केली. ३ फेब्रुवारी रोजी तक्रारदार यांनी डॉ. सुर्यवंशी यांच्याकडे बिलासंदर्भात विचारणा केली. त्यावेळी रक्कमेची तडजोड होऊन १० हजार तरी द्यावे, असे डॉ. सुर्यवंशी यांनी सांगितले. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. ६ फेब्रुवारी रोजी पंचा समक्ष लाच मागणी पडताळणीमध्ये १० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार ७ फेब्रुवारी रोजी बारागाव नांदूर प्राथमिक आरोग्य येथे तक्रारदार यांच्याकडून महिला वैद्यकीय अधिकरी डॉ. सुर्यवंशी यांनी रोख स्वरूपात लाच स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उप अधिक्षक हरिष खेडकर, पोलिस अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, महिला पोलिस नाईक संध्या म्हस्के, चालक पोलिस हवालदार हारूण शेख यांच्या पथकाने रंगेहाथ पैसे स्विकारताना कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news