नगर : गावठी कट्ट्यासह एकास अटक; तोफखाना पोलिसांची कारवाई | पुढारी

नगर : गावठी कट्ट्यासह एकास अटक; तोफखाना पोलिसांची कारवाई

नगर; पुढारी वृत्तसेवा : देशी बनावटीचा गावठी कट्टा विक्री करणार्‍याला तोफखाना पोलिसांनी जेरबंद केले आहे. रविवारी (दि.5) दुपारच्या सुमारास कल्याण रोडवरील जाधव पेट्रोल पंपाजवळ सापळा लावून कट्टा विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून 30 हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचा गावठी कट्टा व दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
देविदास भिवाजी ढगे (रा. केतकी, ता.जि. नगर) असे या आरोपीचे नाव आहे.

एक व्यक्ती कल्याण रोडवरील जाधव पेट्रोल पंपाजवळ गावठी कट्टा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती तोफखाना पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली होती. त्यानुसार तेथे पथक सापळा लावून थांबलेले असताना पल्सर दुचाकीवरून एक व्यक्ती तेथे आला. पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने अंगझडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचा एक गावठी कट्टा आढळून आला. त्याच्याकडून 30 हजार रुपये किमतीचा एक देशी बनावटीचा स्टिलचा गावठी कट्टा, 60 हजार रुपये किमतीची दुचाकी असा 90 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक केलेल्या आरोपीवर तोफखाना पोलिस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला. तोफखाना पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक प्रमुख पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंके, हवालदार डी. बी. जपे, संदीप थामणे, सतीश त्रिभुवन, शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, गौतम सातपुते, सतीश भवर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Back to top button