नगर : राहणेमळ्यात नरभक्षक बिबट्याचा मुक्तसंचार | पुढारी

नगर : राहणेमळ्यात नरभक्षक बिबट्याचा मुक्तसंचार

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर शहरालगत आरगडे मळा परिसरात एका बालकावर प्राणघातक हल्ला करून धुम ठोकलेल्या बिबट्याने परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आरगडे मळा, रहाणे मळा, गुंजाळ मळा, लक्ष्मी नगर परिसरातील नागरिक अक्षरशः भयभीत झाले आहेत. गुंजाळवाडी शिवारात आरगडे मळा येथील शिवम पवार या चार वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला केला, मात्र त्याच्या आईने जिवाची पर्वा न करता बिबट्याचा पाठलाग करून चिमुकल्या मुलाचा जीव वाचविला.

मात्र बिबट्या याच भागात पसार झाला आहे. वनविभागाने पिंजरा लावूनही अद्याप नरभक्षक बिबट्या पिंजर्‍यात जेरबंद झाला नाही. या बिबट्याचे दर्शन दररोज होत आहे. गुंजाळवाडी रोड शहरालगत असल्याने येथे हॉटेल्स व नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. या रस्त्यावर दिवस- रात्र नागरिकांची मोठी वर्दळ असते. या भागात शहरातील आजु- बाजूचे नागरिक सकाळी फिरण्यास येतात, परंतु बिबट्याचा संचार वाढल्याची वार्ता वार्‍यासारखी सर्वत्र पसरताच फिरण्यास येणारे नागरिक येत नाहीत.

Back to top button