नगर : आ.लंकेंच्या सत्काराला भाजप नगरसेवक ! | पुढारी

नगर : आ.लंकेंच्या सत्काराला भाजप नगरसेवक !

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा  : पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीलेश लंके श्रीगोंदा तालुक्याच्या दौर्‍यावर आले असता, श्रीगोंदा नगरपालिकेच्या काही भाजप नगरसेवकांनी त्यांची भेट घेऊन सत्कार केला. त्यामुळे राजकीय पटलावर वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. भाजप नेत्यांची कार्यकर्त्यांवरील पकड ढिली झाली की काय, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.  लोकसभा निवडणुकीस अजून दीड वर्ष अवकाश असताना निवडणुकीचे वारे मात्र जोरात वाहू लागले आहे. आमदार लंके यांनी श्रीगोंदा तालुक्यावर विशेष लक्ष केंद्रित केल्याने ते लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. अर्थात आ. लंके यांनी त्याचा इन्कार केला असला तरी, राजकारणात कधी काय होईल, हे कुणालाच सांगणे शक्य नसते.

आ. लंके श्रीगोंदा येथे पत्रकारांच्या सन्मान करण्यासाठी आले होते. त्या कार्यक्रमादरम्यान भाजपच्या पाच नगरसेवकांनी एन्ट्री करत आ. त्यांचा सत्कार केला. पण, हा कार्यक्रम पत्रकार मंडळीचा असल्याचे लक्षात येताच या नगरसेवकांनी तिथून काढता पाय घेतला.
घटना छोटीशी असली तरी त्याचे वेगवेगळे कंगोरे आता चर्चेत आले आहेत. एकीकडे खा.डॉ.सुजय विखे श्रीगोंद्या आले की, हेच नगरसेवक त्यांच्या मागे-पुढे असतात. आता विखे-लंके यांचे द्वंद्व जिल्ह्यातच नव्हे तर, राज्यात चर्चेत असताना या नगरसेवकांनी आ. लंके यांचा सत्कार करण्याचे प्रयोजन काय असू शकते, हाही कळीचा मुद्दा या निमित्ताने समोर आला आहे.

मागील आठवड्यात शिंदे गटात प्रवेश केलेल्या गणेश भोस यांनी सत्यजित तांबे यांचा सत्कार केला होता. या सत्काराची चर्चा थांबत नाही, तोच आता भाजपच्या नगरसेवकांनी आ.लंके यांचा सत्कार केल्याने श्रीगोंदा तालुक्यातील नेतेमंडळींच नेमकं चाललंय तरी काय, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

Back to top button