नगर : बसमधील प्रवाशी बालंबाल बचावले ! नगर-दौंड महामार्गावर बस व पिकअपचा भीषण अपघात | पुढारी

नगर : बसमधील प्रवाशी बालंबाल बचावले ! नगर-दौंड महामार्गावर बस व पिकअपचा भीषण अपघात

वाळकी : पुढारी वृत्तसेवा :  नगर – दौंड महामार्गावर नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद गावाजवळ असलेल्या घोसपुरी फाट्यावर मंगळवारी (दि.10) रात्री सव्वा नऊ वाजता एस.टी. बस व मालवाहू पिकअप यांच्यात समोरासमोर धडक होवून भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील सर्व प्रवाशी बालंबाल बचावले, तर पिकअप चालक मात्र गंभीर जखमी झाला. त्याच्यावर नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

या अपघातात महादेव वाघ (रा. शिरढोण, ता.नगर), असे त्या चालकाचे नाव आहे. वाघ त्यांची मालवाहू पिकअप घेऊन बारामतीहून नगरला येत होते. यावेळी नगरहून दौंडकडे जाणारी श्रीगोंदा आगाराची एस.टी. बस आणि पिकअप यांच्यात घोसपुरी फाट्यासमोर समोरासमोर जोराची धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, मोठा आवाज झाला. या आवाजाने जवळच असलेल्या हॉटेल, तसेच पेट्रोल पंपावरील नागरिक त्या ठिकाणी धावले. अपघातात पिकअपची पुढील बाजूने पूर्णपणे चेपली असून, रस्त्याच्या कडेला खाली जावून उलटली. तर बसचेही मोठे नुकसान झाले. स्थानिकांनी जखमी व पिकअप चालक महादेव वाघ यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी नगरमधील खासगी रुग्णालयात हलविले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.

Back to top button