नगर : मोटारसायकलचा धक्का लागल्यावरून मारहाण | पुढारी

नगर : मोटारसायकलचा धक्का लागल्यावरून मारहाण

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  मोटरसायकलवर जात असताना धक्का लागल्याच्या कारणावरून अज्ञात तिघांनी सचिन जगधने या तरूणाला लाथा-बुक्क्या व दगडाने मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. राहुरी शहरातील हॉटेल अमर शेजारील रोडवर ही घटना घडली.  सचिन भगवान जगधने (वय 34, रा. लक्ष्मीनगर, राहुरी) हा तरूण कलर पेन्टींगचे काम करून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. दि. 1 जानेवारी रोजी रात्री 10.30 वाजे दरम्यान तो राहुरी शहरातील अमर हॉटेलच्या शेजारील रोडने त्याच्या मोटारसायकलवर घरी जात होता. त्यावेळी समोरुन मोटारसायकलवरून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी सचिन जगधने याच्या मोटारसायकलीस धक्का दिला.

‘तू आमचे मोटारसायकलीस धक्का का दिला?’ असे म्हणून सचिन जगधने याला शिवीगाळ केली. तेव्हा सचिन जगधने त्यांना म्हणाला की, ‘तुम्ही शिवीगाळ करु नका, तुम्हीच माझे मोटारसायकलीस धक्का दिलेला आहे.’ या गोष्टीचा त्यांना राग येवून त्यांनी सचिनला लाथा- बुक्क्यांनी व दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच ‘तू आमचे गाडीची भरपाई दिली नाहीतर तुझी मोटारसायकल आम्ही घेवून जातो’, अशी धमकी दिली.  घटनेनंतर सचिन भगवान जगधने या तरूणाने राहुरी पोलिस ठाण्यात हजर राहून फिर्याद दिली. त्याच्या फिर्यादीवरून तीन आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Back to top button