नगर : बोर्ले गावात सव्वा लाखाची घरफोडी | पुढारी

नगर : बोर्ले गावात सव्वा लाखाची घरफोडी

नान्नज : पुढारी वृत्तसेवा  : जामखेड तालुक्यातील बोर्ले येथील बापूसाहेब वैजीनाथ चव्हाण यांच्या राहत्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयना तोडून शोकेसमधील एक लाख रुपये रोख व पाच ग्रॅम सोन्याची नथ असा एकूण सव्वा लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. दि.26 डिसेंबर रोजी मध्यरात्री चोरटयांनी ही चोरी केली. याबाबत बापूसाहेब चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला.

बोर्ले येथील बापूसाहेब चव्हाण जामखेड-करमाळा रस्त्यालगत असलेल्या घरात कुटुंबासमवेत राहतात. दि. 26 डिसेंबर रोजी दैनंदिन कामकाज उरकून सायंकाळी नऊच्या दरम्यान घराच्या सर्व दरवाजे बंद करून सर्व कुटुंबीय झोपी गेले. रात्री 1.45 वाजता चव्हाण लघुशंकेसाठी उठले असता, त्यांना घराचा मुख्य दरवाजा उघडा दिसला. दरवाजाचा कडी-कोयडा तुटून जमिनीवर पडलेला दिसला. तसेच बेडरूमचा दरवाजाही उघडा दिसला. तसेच बेडरूममधील लोखंडी शोकेसचे लॉकर उघडे होते. त्यामुळे चव्हाण यांनी आईला विचारता, तिने मी झोपेत होते, असे सांगितले. लॉकरमधील एक लाख रुपये चोरीस गेल्याचे लक्षात आले.

Back to top button