लोणी; पुढारी वृत्तसेवा : अवैध वाळू उत्खननास प्रतिबंध घालण्यासाठी लवकरच सर्वंकष धोरण आणण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तहसीलदार यांनी पिंपळखुटा रोडवर 13 व 14 व्या शतकातील पुरातन सोमतीर्थ, बारव पुरातन थडगे असलेली जमीन, लोणार तहसील कार्यक्षेत्रात वाळूची अवैध वाहतुकीसह तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खननाबाबत सदस्य संजय गायकवाड यांनी लक्षवेधी मांडली होती.
यावर उत्तर देताना मंत्री विखे बोलत होते. विखे म्हणाले की, या धोरणामुळे अवैध वाळू उपसा करणार्यांना चाप बसेल. सामान्य नागरिकांना सरकारी डेपोतून वाळू उपलब्ध होईल. याबाबत सर्व जिल्हाधिकार्यांना उत्खनन करणार्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लोणारमधील अवैध वाळू वाहतुकीबाबत अमरावतीच्या विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. लोणारचे तहसीलदारांबाबत गंभीर स्वरुपाच्या तक्रारी बुलढाणा जिल्हाधिकार्यांकडे प्राप्त झाल्या आहेत. चौकशीनंतर प्राप्त निष्कर्षाच्या आधारे संबंधित अधिकार्यांवर कारवाई करण्यात येईल, असे विखे म्हणाले.