नव वर्षानिमित्त शिर्डी महोत्सव 31 डिसेंबर रोजी श्रीसाई दर्शनास मंदिर रात्रभर खुले | पुढारी

नव वर्षानिमित्त शिर्डी महोत्सव 31 डिसेंबर रोजी श्रीसाई दर्शनास मंदिर रात्रभर खुले

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा :  येथील श्रीसाईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने नाताळ सुट्टी, चालु वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त शिर्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, श्रीसाईबाबांच्या दर्शनास शिर्डीत होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेवून समाधी मंदिर शनिवार (दि. 31 डिसेंबर) रोजी दर्शनास रात्रभर खुले ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली. जाधव म्हणाले, दरवर्षी नाताळ सुट्टी, चालु वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त श्रींच्या दर्शनास शिर्डीत गर्दी होते. येणार्‍या सर्व भाविकांना श्रींच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ मिळावा. गर्दीचे नियोजन योग्य रितीने व्हावे, या उद्देशाने (दि. 31 डिसेंबर) रोजी श्रींचे समाधी मंदिर दर्शनास रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे. (दि. 31 डिसेंबर) रोजीची शेजारती व (दि.1 जानेवारी 2023) रोजी पहाटेची काकड आरती होणार नाही.

नाताळ व नवर्षाच्या सुट्टीच्या गर्दीमुळे शनिवार (दि. 24 डिसेंबर ते रविवार दि.1 जानेवारी 2023) रोजी असे 9 दिवस वाहन पुजा बंद राहतील, परंतु नाताळ सुट्टी कालावधीत श्रीसाई सत्यव्रत पुजा, अभिषेक पुजा सुरु राहिल, याची श्रीसाईभक्तांनी नोंद घ्यावी, असे सांगत मंदिर व परिसरात फटाके व वाद्य वाजविण्यास मनाई करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन जाधव यांनी केले आहे. महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानचे सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभागांचे विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्नशिल आहेत.

Back to top button