नगर : प्रेमसंबंध ठेव, विवाहितेवर जबरदस्ती ; विनयभंग करत अ‍ॅसिड टाकण्याची धमकी | पुढारी

नगर : प्रेमसंबंध ठेव, विवाहितेवर जबरदस्ती ; विनयभंग करत अ‍ॅसिड टाकण्याची धमकी

नगर : पुढारी वृत्तसेवा : विवाहित तरूणीला ओळखीतील मित्रानेच प्रेमसंबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत, कामाच्या ठिकाणी येऊन विनयभंग केल्याची घटना बुधवारी (दि.14) बोल्हेगाव रोडवर घडली. प्रेमसंबंध न ठेवल्यास अ‍ॅसिड टाकून चेहरा खराब करण्याची धमकीही त्याने दिली. याबाबत 27 वर्षीय विवाहितेनेे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीवर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक बाबासाहेब ससे (रा.ससेवाडी, ता.जि.नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी अशोक ससे व प्रियाची (नाव बदलेले आहे) गत 5 ते 6 वर्षांपासून ओळख आहे. मैत्रीमध्ये प्रेमाचे संबंध ठेवण्यासाठी प्रियावर दबाव टाकत असल्याने आरोपी अशोक सोबत तिने तीन वर्षांपासून बोलणे बंद केले होते. दरम्यान, बुधवारी (दि.14) प्रिया नोकरीसाठी असलेल्या ठिकाणी अशोक आला व फोन करून बाहेर बोलावले.

बाहेर आल्यानंतर अशोकने प्रियाला बोलेरो गाडीमध्ये बसण्यासाठी सांगितले. गाडी चालू करून तेथून घेऊन जात असल्याने प्रियाने गाडीमधून उतरण्याचा प्रयत्न केला असता, त्याने गाडी थांबविली आणि उजव्या हाताला पकडून विनयभंग केला. तसेच, चापटीने मारहाण केली. तू जर प्रेमाचे संबंध ठेवले नाही तर अ‍ॅसिड टाकून तुझा चेहरा खराब करीन, अशी धमकी दिली. प्रियाने आरडाओरडा केला असता तेथे लोकांची गर्दी झाली.  गर्दीचा फायदा घेऊन प्रिया तेथून कामाच्या ठिकाणी आल्यानंतर आरोपी तेथे पुन्हा आला व गाड्यांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे प्रियाने 112 नंबरवर कॉल करून पोलिसांची मदत मागितली. काही वेळातच पोलिस त्या ठिकाणी आले व दोघांनाही एमआयडीसी पोलिस ठाण्यात घेऊन गेले. घटना तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Back to top button